आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील पाचवा आणि शेवटचा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर गुजरात टायटन्सने 20 षटकात 6 गडी गमवून 168 धावा केल्या आणि विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं. मुंबई इंडियन्सला 9 गडी गमवून 162 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा 6 धावांनी पराभव झाला. या स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. खरं तर हा संपूर्ण सामना 15 व्या षटकापर्यंत मुंबई इंडियन्सच्या पारड्यात होता. मात्र त्यानंतर जे काही झालं ते मुंबईच्या चाहत्यांना कळण्याच्या पलीकडे होतं. या पराभवाचं विश्लेषण हार्दिक पांड्याने सामन्यानंतर केलं आहे.
मुंबई इंडियन्सला विजयासाठी 30 चेंडूत 43 धावांची आवश्यकता होती. मैदानात डेवॉल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा ही जोडी होती. ब्रेविसने तिथपर्यंत 43 धावा ठोकल्या होत्या. तर तिलक वर्मा 10 चेंडूत 15 धावांवर खेळत होता. 16 वं षटक मोहित शर्माने टाकलं. यात पहिल्या चेंडूवर धाव आली नाही. दुसऱ्या चेंडूवर 2, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर 1 धाव आली. पाचव्या चेंडूवर मोहित शर्माने ब्रेव्हिसला तंबूचा रस्ता दाखवला. शेवटच्या चेंडूवर टीम डेविडने एक धाव घेतली.
पाच षटकांचं विश्लेषण करताना हार्दिक पांड्या म्हणाला की,”42 धावांचा पाठलाग करणं तसं सोपं होतं. पण आम्ही मोक्याच्या लय गमावली. पाच षटकात इतक्या धावा करणं तुलनेनं सहज शक्य होतं. पण दिवस आमचा नव्हता.” त्यानंतर तिलक वर्माने राशीद खानच्या षटकात धाव न घेण्याचं कारणही विचारलं . तेव्हा हार्दिक पांड्याने त्याचं समर्थन केलं. “तिलक वर्माला त्यावेळेस असं करणं योग्य वाटलं असावं. मी पूर्णपणे त्याच्या पाठिशी आहे. यात काही वाद नाही. अजून 13 सामने असून आम्ही सकारात्मकतेने पुढे जाऊ.” असं हार्दिक पांड्याने सांगितलं.
🗣️ "Just wasn't our day"
Hardik Pandya comments about #GTvMI 💬👇#MumbaiMeriJaan #MumbaiIndianshttps://t.co/dqtLQyBpB4
— Mumbai Indians (@mipaltan) March 25, 2024
गुजरात टायटन्सने 17वं षटक राशीद खानला सोपवलं होतं. टिम डेविड मैदानात होता. पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर त्याने 1 धाव घेतली आणि तिलक वर्माला स्ट्राईक दिल्ली. तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्माने मिड विकेटला चेंडू मारला आणि सहज एक धाव होती पण त्याने घेतली नाही. चौथा चेंडू निर्धाव गेला. तर पाचव्या चेंडूवर एक धाव घेत टिम डेविडला स्ट्राईक दिली. शेवटच्या चेंडूवर टीम डेविडने एक धाव घेतली. खरं तर आयपीएलचा मागचा इतिहास पाहिला तर टिम डेविडने राशीदच्या 8 चेंडूंचा सामना केला आहे. त्यात 9 धावा आणि दोन वेळा बाद झाला आहे.