MI vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचं मुंबईसमोर 170 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

| Updated on: May 03, 2024 | 11:55 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 51वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यातील विजय मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

MI vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचं मुंबईसमोर 170 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
Image Credit source: Twitter
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील 51वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. हार्दिक पांड्याने दव फॅक्टर डोळ्यासमोर ठेवून तात्काळ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहित शर्मा सब्सिट्यूट म्हणून डगआऊटमध्ये आहे. दुसऱ्या डावात इशान किशनसोबत फलंदाजीला उतरेल यात शंका नाही. मात्र प्रथम गोलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकात्याला बॅकफूटवर ढकललं. पॉवर प्लेमध्ये निम्मा संघ तंबूत पाठवला. 6.1 षटकात 57 धावा असताना 5 गडी तंबूत बसले होते. फिल सॉल्ट, सुनील नरीन, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंह स्वस्तात बाद झाले. तर वेंकटेश अय्यरने इम्पॅक्ट प्लेयर मनिष पांडेसोबत डाव सावरला.  वेंकटेश अय्यरने कोलकात्याचा संघ संकटात असताना सावध फलंदाजी केली. 38 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याला मनिष पाडेची उत्तम साथ लाभली. दोघांनी मिळून 82 धावांची भागीदारी केली. कोलकाता नाईट रायडर्सने 19.4 षटकात सर्वबाद 169 धावा केल्या आणि विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं.

नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्ट बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर तिसऱ्या षटकात दुसऱ्या आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा विकेट्स काढल्या. अंगकृष रघुवंशी आणि श्रेयस अय्यर यांना तंबूत पाठवलं. फॉर्मात असलेल्या सुनील नरीनचा हार्दिक पांड्याने त्रिफळा उडवला. तर पियुष चावलाने पॉवर प्लेनंतर टाकलेल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिंकू सिंहला बाद केलं.  त्यानंतर वेंकटेश अय्यर आणि मनिष पांडे यांची जमलेली जोडी तोडण्यात हार्दिक पांड्याला यश आलं. तर शेवटच्या काही षटकांमध्ये बुमराहने भेदक गोलंदाजी केली आणि तीन गडी बाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.