रोहित शर्मा याला पुन्हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन करावं, असं टीम इंडियाचा माजी खेळाडू मनोज तिवारी म्हणाला आहे. मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 17 व्या हंगामात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मुंबईला हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात सलग 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. मुंबईचा 1 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध या 17 व्या हंगामातील तिसरा पराभव ठरला. मुंबईला आधी गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबादकडून पराभूत व्हावं लागलं.
हार्दिक पंड्या याला गुजरात टायटन्समधून ट्रेड करुन मुंबईत घेण्यात आलं. त्यानंतर हार्दिकला रोहित शर्मा याला हटवून कर्णधार करण्यात आलं. मात्र हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईच्या कामगिरीचा आलेख कोसळला. हार्दिकला आपल्या नेतृत्वात मुंबईला 17 व्या हंगामात 3 पैकी एकही सामन्यात विजय मिळवून देता आला नाही. मुंबईचा राजस्थान विरुद्ध पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मनोज तिवारी याने क्रिकबझसोबत बोलताना रोखठोक विधान केलं आहे.
“रोहित शर्माकडे मुंबईच्या कर्णधारपदाची जबबादारी द्यायला हवी. मुंबईच्या सर्वेसर्वांना निर्णय घेताना कोणतीही अडचण होत नाही, हे यावरुन मला समजलं. त्यांनी निर्णय करुन रोहितला हटवून हार्दिकला कॅप्टन केलं. रोहितने मुंबईला आपल्या नेतृत्वात 5 आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत” असं मनोज तिवारी म्हणाला.
“कर्णधार बदलणं मोठा निर्णय आहे. मुंबईला या हंगामात पॉइंट्स मिळवता आलं नाहीय.कॅप्टन्सी सर्वच ठिकाणी आहे. असं नाही की हार्दिकची कॅप्टन्सी चांगली आहे आणि नशिबाची साथ नाही. हार्दिकची कॅप्टन्सी चांगली राहिली नाही”, असंही मनोजने म्हटलं.
दरम्यान ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांच्या बॉलिंगसमोर मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 125 धावा करता आल्या. राजस्थानला विजयासाठी 126 धावांचं आव्हान मिळालं. राजस्थानने हे आव्हान 27 बॉलआधी 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
दरम्यान मुंबई 14 सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून पहिल्या म्हणजे दहाव्या क्रमांकवर आहे. मुंबईचा तिन्ही सामन्यातील पराभवानंतर नेट रनरेट हा आणखी घसरला आहे. तर राजस्थान रॉयल्स 3 विजयासह अव्वल स्थानी आहे. तर कोलकाता आणि चेन्नई दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे.