रोहितसोबत चुकीचं वर्तन, हार्दिक ट्रोल, नेटकरी म्हणाले ऋतुराजकडून शिकावं

| Updated on: Mar 25, 2024 | 9:38 PM

Hardik Pandya Ipl 2024 Rohit Sharma : कॅप्टन हार्दिक पंड्या याने रोहितला दिलेली वागणूक पाहून मुंबईचे चाहते चांगलेच खवळलेत. हार्दिकवर गेल्या काही तासांपासून चौफेर टीका होत आहे.

रोहितसोबत चुकीचं वर्तन, हार्दिक ट्रोल, नेटकरी म्हणाले ऋतुराजकडून शिकावं
rohit hardik ruturaj and dhoni
Follow us on

हार्दिक पंड्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीका होत आहे. या टीकेत गेल्या काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रोहित शर्मा याला हटवून हार्दिक पंड्या याला मुंबईचं कर्णधारपद देण्यात आलं. हा फ्रँचायजीचा निर्णय होता. मात्र त्यानंतरही हार्दिकला टीका सहन करावी लागतेय. त्यात 24 मार्च रोजी कॅप्टन हार्दिकने गुजरात विरुद्धच्या सामन्यात रोहितला फिल्डिंगसाठी चांगलंच पळवलं. तसेच काही वेळा त्याच्याकडे दुर्लक्षही केलं. हार्दिकचं माजी कर्णधार रोहितसोबत अशाप्रकारे वागणं नेटकऱ्यांना काही पटलं नाही. त्यावरुन नेटकऱ्यांनी हार्दिकवर टीकेची झोड उठवली. इतकंच नाही, तर माजी कर्णधारासोबत कसं वागावं हे हार्दिकने ऋतुराज गायकवाड याच्याकडून शिकावं, असा सल्लाही दिला आहे.

आयपीएलच्या 17 व्या हंगामात काही खेळाडूंना कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली. चेन्नईने 22 मार्चला पहिल्या सामन्याच्या आधी आपला नवा कर्णधार जाहीर केला. महेंद्रसिंह धोनी याने राजीनामा दिल्याने पुणेकर ऋतुराज गायकवाड याला नेतृत्वाची धुरा देण्यात आली. ऋतुराजने आरसीबी विरुद्ध धोनीच्या मार्गदर्शनात चेन्नईचं नेतृत्व केलं. धोनीने त्याची वेळोवेळी मदत केली. तसेच ऋतुराजने नम्रपणे धोनीचा सल्ला ऐकला.

नेटकऱ्यांचा हार्दिक पंड्या याला सल्ला

तर दुसऱ्या बाजूला हार्दिक पंड्या याने मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला डावळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नेटकऱ्यांनी हार्दिकला फैलावर घेतलं. माजी कर्णधाराचा सन्मान कसा करावा, हे हार्दिकने ऋतुराजकडून शिकावं, अशा आशयाची फेसबूक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. या फेसबूक पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यात एका नेटकऱ्याने “मराठी आहे भावा गायकवाड शेवटी संस्कार”, अशी कमेंट केली आहे. तसेच या पोस्टमध्ये हार्दिकला खरंच सन्मान कसा करायचा हे ऋतुराजकडून शिकायला हवं, याबाबत अनेकांनी सहमत दर्शवली आहे.