मुंबई | आयपीएल 17 व्या हंगामाला सुरुवात 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. मोसमातील पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सची ही आयपीएलच्या इतिहासातील पहिला सामना खेळण्याची नववी वेळ ठरणार आहे. महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात सीएसकेने याआधी 2009, 2011, 2012, 2018, 2019, 2022 आणि 2023 हंगामातील सलामीचा सामना खेळला आहे. पहिल्या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र त्याआधी रंगारंग कार्यक्रमाकडे रसिकांचं लक्ष आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमाच्या उद्घाटन समारोहाला अनेक दिग्गज कलाकार उपस्थिती लावणार आहेत. तसेच अनेक कलाकार हे कलाकृती सादर करणार आहेत. मात्र हा उद्घाटनाचा कार्यक्रम कधी आणि कुठे होणार? तसेच टीव्ही आणि मोबाईलवर हा कार्यक्रम कुठे पाहता येईल, हे आपण जाणून घेऊयात. रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2024 च्या उद्घाटन कार्यक्रमाला संगीतकार सोनू निगम, एआर रहमान, अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ उपस्थितांसमोर खास कार्यक्रम सादर करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोनू निगम आणि एआर रहमान देशभक्तीपर 30 मिनिटांचं विशेष सादरीकरण करणार आहेत.
आयपीएल 2024 उद्घाटन कार्यक्रम 22 मार्च रोजी एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सलामीच्या सामन्याआधी या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
हंगामातील पहिला सामना हा 22 मार्च रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्याला उद्घाटन कार्यक्रमांनंतर सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा सामना रात्री 8 वाजता सुरु होईल. तर त्यानंतर दुपारचे सर्व सामने 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील. तर संध्याकाळचे सामने हे 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील.
दरम्यान सार्वत्रिक निवडणुकांमुळे बीसीसीआयने यंदा आयपीएलच्या 17 व्या हंगामाचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात एकूण 17 दिवसांमध्ये 2 डबल हेडरसह एकूण 21 सामने पार पडणार आहेत. हंगामातील पहिल्या डबल हेडरचं आयोजन हे शनिवारी 23 मार्च रोजी करण्यात आलं आहे. तसेच उर्वरित वेळापत्रक हे लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिलीय.