IPL 2024, PBKS vs DC : पंजाब किंग्सने सामना जिंकला तरी शिखर धवनला एक दु:ख, बोलून टाकलं मनातलं

| Updated on: Mar 23, 2024 | 9:00 PM

आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाने विजयाने सुरुवात केली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पंजाब किंग्सने 6 विकेट्स गमवून पूर्ण केलं. 19.2 षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. या विजयानंतर कर्णधार शिखर धवन याने आपलं मन मोकळं केलं आहे.

IPL 2024, PBKS vs DC : पंजाब किंग्सने सामना जिंकला तरी शिखर धवनला एक दु:ख, बोलून टाकलं मनातलं
पंजाब किंग्सच्या विजयानंतरही शिखर धवनच्या मनात एक सळ कायम, सामन्यानंतर म्हणाला...
Follow us on

आयपीएल जेतेपदाचं स्वप्न उराशी घेऊन पंजाब किंग्स संघ पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. मागच्या 16 पर्वात पंजाब किंग्सच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे यंदातरी नशिब साथ देईल अशी आशा चाहत्यांना आहे. पंजाब किंग्सची धुरा शिखर धवनच्या हाती असून मागच्या आयपीएलनंतर आता मैदानात उतरला आहे. पहिलाच सामना दिल्ली कपिटल्सशी होता. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पंजाबने शेवटच्या षटकात पूर्ण केलं. पंजाबचा डाव सुरुवातीला अडखळला होता. मात्र सॅम करन आणि लियाम लिविंगस्टोनने अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. तर सॅम करनने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं. 47 चेंडूत 63 धावांची खेळी केली. कर्णधार शिखर धवननेही आक्रमक सुरुवात करून दिली होती. त्याने 16 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 22 धावा केल्या होत्या. मात्र इशांत गोलंदाजीवर क्लिन बोल्ड होत तंबूत परतावं लागलं. पण मधल्या फळीत उतरलेल्या सॅम करन आणि लिविंगस्टोन यांनी विजयाचा मार्ग सुकर केला. या विजयानंतर कर्णधार शिखर धवनने मन मोकळं केलं.

“मला पुन्हा एकदा मैदानात उतरून बरं वाटतंय. मागच्या आयपीएलमध्ये खेळलो होतो. त्यानंतर थेट आता या आयपीएलमध्ये उतरलो आहे. थोडासा नर्वस होतो.”, असं पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन याने सांगितलं. इनिंग ब्रेकमध्ये काय गप्पा होत होत्या? हा प्रश्न विचारताच शिखर धवन म्हणाला की, “मी कोणाशीही काहीच चर्चा केली नाही. कारण मला फलंदाजीला जायचं होतं. गोलंदाजांना त्यांची स्पेस हवी आहे. त्यामुळे त्यांच्याशी उद्या चर्चा करेन आणि आणखी चांगलं कसं करता येईल यावर बोलेन.”

“आम्ही अवांतर धावा दिल्या. हा स्पर्धेतील पहिला सामना होता आणि आता त्यातून शिकायला हवं. विकेट फलंदाजीसाठी चांगली होती आणि सॅम खरंच चांगला खेळला. लिवीने त्याच्या शैलीत सामन्याचा शेवट केला. या नवा मैदानाबाबत फारसं काही माहिती नव्हतं. त्यामुळे फारसा विचार केला नव्हता. आम्ही दिवसा आणि रात्री प्रकाशाखाली सराव करत होतो.”, असंही शिखर धवन म्हणाला.

पंजाब किंग्सचा पुढचा सामना 25 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध आहे. त्यानंतर 30 मार्चला लखनौ सुपर जायंट्सशी आणि 4 मार्चला गुजरात टायटन्सशी सामना होणार आहे.