मुंबई | आयपीएल 17 व्या मोसमाला आता काही दिवस शिल्लक आहेत. मात्र त्यानंतर अजूनही आयपीएलचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेळापत्रक अद्याप जाहीर केलेलं नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी प्रतिक्षा ताणली गेली आहे. मात्र अशात आयपीएलच्या 17 व्या मोसमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या हंगामाला केव्हापासून सुरुवात होणार, पहिला सामना केव्हा होणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 17 व्या हंगामाची तारीख समोर आली आहे. या 17 व्या पर्वाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. याबाबतची माहिती आयपीएल चेयरमन अरुण धुमल यांनी मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी माध्यमांना दिली. मात्र त्यानंतरही वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? याबाबत क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा कायम राहिली आहे.
यंदा लोकसभा निवडणूक असल्याने वेळापत्रक जाहीर करायला विलंब झाला आहे. आयपीएल स्पर्धेतील सामने हे भारतातील 9-10 शहरांमध्ये होतात. त्यात लोकसभा निवडणुकांमुळे मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा गरजेची असते. त्यामुळे जेव्हा ज्या शहरांमध्ये लोकसभा निवडणुका नसतील, त्या शहरात सामने आयोजित केले जाण्याची तयारी असल्याची माहिती आहे.
“आयपीएल स्पर्धेची सुरुवात 22 मार्चपासून करण्याचे प्रयत्न आहेत. स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. स्पर्धेत दर 5 वर्षांनी निवडणुकांमुळे वेळापत्रक फिस्कटतं. पहिल्यांदा 2009 मध्ये असं झालं होतं, ज्यामुळे स्पर्धेचं आयोजन हे दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं होतं”, अशी माहिती पीटीआयने अरुण धुमल यांच्या हवाल्याने दिली.
आयपीएलच्या 17 व्या मोसमाबाबत मोठी अपडेट
Planning to start IPL 2024 from March 22: League Chairman Arun Dhumal.#IPL2024 pic.twitter.com/2C4vC2NPIq
— IANS (@ians_india) February 20, 2024
ज्या राज्यांमध्ये नंतर लोकसभा निवडणूक असेल, तिथे आधी सामन्यांचं आयोजन केलं जाईल. तर त्यानंतर जिथे मतदान असेल, तिथे अखेरच्या टप्प्यात सामने आयोजित केले जातील. त्यामुळे आता इतकं निश्चित झालंय की लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानंतरच आयपीएलचं बिगूल वाजेल.
दरम्यान 1 ट्रॉफीसाठी 10 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ससमोर विजेतेपद राखण्याचं आव्हान असणार आहे. चेन्नईने 16 व्या मोसमात गुजरात टायटन्सचा शेवटच्या बॉलवर चौकार ठोकून अंतिम सामन्यात थरारक विजय मिळवला होता. चेन्नईने यासह मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक 5 आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती.