आयपीएलच्या 17 व्या मोसमात 8 मे रोजी सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्सवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. हैदराबाद या हंगामात 10 विकेट्सने विजय मिळवणारी पहिली टीम ठरली. लखनऊ सुपर जायंट्सने या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. आयुष बदोनी आणि निकोलस पूरन या दोघांनी केलेल्या 99 धावांच्या नाबाद भागीदारीच्या जोरावर लखनऊने हैदराबादला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान हैदराबादच्या ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने 10 ओव्हरआधीच पूर्ण केलं.
हैदराबादने या मोठ्या फरकाने सामना जिंकला. त्यामुळे त्यांचा नेट रनरेट चांगलाच सुधारला आहे. हैदराबाद लखनऊ विरुद्धच्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये थेट तिसऱ्या स्थानी पोहचली आहे. हैदराबादने या विजयासह प्लेऑफमधील आव्हान कायम राखलं. तसेच हैदराबादने प्लेऑफमधील आपली दावेदारी आणखी मजबू केली आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स पहिल्या आणि राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.
प्लेऑफसाठी अद्याप कोणतीही टीम ठरलेली नाही. अद्याप 4 जागांसाठी स्पर्धा सुरुच आहे मात्र 3 संघांनी आपली दावेदारी मजबूत केली आहे. त्यामुळे चौथ्या जागेसाठी दिल्ली कॅपिट्ल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोघांमध्ये जोरदार चढाओढ आहे. या दोघांपैकी कोणतीही एक टीम चौथ्या जागेसाठी पात्र ठरु शकते. तसेच लखनऊ सुपर जायंट्सलाही संधी आहे.
लखनऊ सुपर जायंट्सला आणखी 2 सामने खेळायचे आहेत. मात्र हैदराबाद विरुद्ध 10 ओव्हरच्या आतच पराभूत झाल्याने त्यांना नेट रनरेटमध्ये मजबूत फटका बसला आहे. त्यामुळे लखनऊला आगामी सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने जिंकावं लागेल. तर चेन्नई सुपर किंग्सलाही उर्वरित सामन्यात फक्त जिंकून चालणार नाही, तर मोठ्या अंतराने विजय मिळवावा लागेल.
ऋषभ पंत याच्या नेतृत्वात दिल्लीने आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले आहेत. दिल्ली आपला पुढील सामना हा 12 मे रोजी खेळणार आहे. दिल्लीचा सामना हा आरसीबी विरुद्ध होणार आहे. दिल्लीने उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास, त्यांच्या प्लेऑफच्या आशा कायम राहतील.