आयपीएल 2024 स्पर्धेत पावसामुळे तीन सामने रद्द करण्याची वेळ आली. क्वॉलिफायर 1 आणि एलिमिनेटर सामन्यातही पावसाचं सावट होतं. पण तसं काही झालं नाही आणि पूर्ण 20 षटकांचा खेळ झाला. आता क्वॉलिफायर 2 फेरीच्या सामन्यासाठी क्रीडाप्रेमी आसुसलेले आहेत. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होणार आहे. दुसरीकडे, दक्षिण भारतात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहे. केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. क्वॉलिफायर 2 फेरीत पावसाने हजेरी लावली तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळणार? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. 24 मे रोजी शुक्रवारी दुसरा क्वॉलिफायर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायझर्स संघासोबत भिडणार आहे. पण असं असताना या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर कोणाला तिकीट मिळणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
साखळी फेरीत पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देऊन विषय संपवला जात होता. मात्र क्वॉलिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वॉलिफायर 2 फेरीचं तसं नाही. या सामन्यात पाऊस पडला तर अतिरिक्त दोन तासांचा वेळ आणि एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. राखीव दिवशीही पावसाने हजेरी लावली तर सुपर ओव्हरने निकाल लावला जाईल. इतकं सगळं करूनही सामन्याचा निकाल लावण्यात अपयश आलं तर साखळी फेरीत सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ अंतिम फेरी गाठेल.
साखळी फेरीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे समाने गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत हैदराबाद वरचढ आहे. त्यामुळे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे अंतिम फेरीसाठी हैदराबादला संधी मिळेल. हैदराबादने साखळी टप्प्यात खेळल्या गेलेल्या 14 पैकी 8 सामने जिंकले, 5 सामने हरले आणि 1 सामना पावसामुळे रद्द झाला. हैदराबादचे 17 आणि निव्वळ धावगती +0.414 आहे.
राजस्थान रॉयल्सनेही साखळी फेरीत 8 सामने जिंकले आहेत. इतर पाच सामन्यात पराभव सहन करावा लागला आणि 1 सामना निकालाविना सुटला. तथापि, राजस्थानचे 17 गुण असून निव्वळ धावगती +0.273 इतकी आहे. ही धावगती हैदराबादच्या तुलनेत कमी आहे.24 मे रोजी चेन्नईतील हवामानाबाबत सांगायचं तर, कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहील. ताशी 41 किमी वेगाने वारे वाहतील. सामन्यादरम्यान पावसाची केवळ 2 टक्के शक्यता आहे. त्यामुळे सामन्याच्या दिवशी पाऊस पडणार नसल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.