IPL 2024, KKR vs SRH : आयपीएल क्वॉलिफायर 1 फेरीत कोलकाता हैदराबाद यांच्यात लढत, कोण वरचढ? ते जाणून घ्या

| Updated on: May 20, 2024 | 3:48 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला क्वॉलिफायर राउंड 21 मे रोजी होत आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येत आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार? कोणाचं पारडं जड आहे ते समजून घेऊयात

IPL 2024, KKR vs SRH : आयपीएल क्वॉलिफायर 1 फेरीत कोलकाता हैदराबाद यांच्यात लढत, कोण वरचढ? ते जाणून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 फेरीत गुणतालिकेत टॉपला असलेले कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. कोलकाता आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे दोन संघांपैकी एक संघ जेतेपद जिंकेल असं मत क्रीडाप्रेमींनी व्यक्त केलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स 20 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 26वेळा आमनेसामने आले आहेत. यात कोलकात्याने 17 वेळा, तर सनरायझर्स हैदराबादने 9 वेळा बाजी मारली आहे. आकडेवारीतून कोलकाता नाईट रायडर्सचं पारडं जड वाटत आहे. पण प्लेऑफचं गणित पाहिलं तर सनरायझर्स हैदराबादने कोलकात्याचा मार्ग अडवला आहे. आतापर्यंत तीनवेळा हे संघ प्लेऑफमध्ये भिडले आहेत. यात हैदराबादने 2 आणि कोलकात्याने एकवेळा बाजी मारली आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम 21 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. या मैदानातील खेळपट्टी सहसा फलंदाजांना सुरुवातीपासूनच मदत करते.या मैदानात आजवर मोठ्या धावसंख्या झालेले सामने पाहण्यात आले आहेत. तथापि, येथे फिरकीपटू फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद भिडले होते. कोलकात्याने 20 षटकात 7 गडी गमवून 208 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादचा संघ 20 षटकात 7 गडी गमवून 204 धावा करू शकला. कोलकात्याने 4 धावांनी विजय मिळवला होता.

गुणतालिकेत टॉप 2 संघांना अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याची अतिरिक्त संधी असते.क्वालिफायर 1 चा विजेता थेट अंतिम फेरीत जाईल, तर पराभूत होणारा एलिमिनेटरच्या विजेत्याची क्वालिफायर 2 मध्ये सामना करेल. एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होत आहे. या सामन्यातील विजेत्या संघ क्वॉलिफायर 2 फेरीत कोलकाता आणि हैदराबाद या सामन्यातील पराभूत झालेल्या संघाशी लढेल.

दोन्ही संघाचे खेळाडू

कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, फिल सॉल्ट, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, अल्लाह गझनफर, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन.

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे , उपेंद्र सिंग यादव, उमरान मलिक, नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, विजयकांत व्यासकांत, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.