आयपीएल 2024 स्पर्धेतील 68वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. या सामन्यातील निकाल प्लेऑफची चौथी जागा भरेल. दोन्ही संघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. खासकरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी हा सामना होणं गरजेचं आहे. पण हवामान खात्यानुसार सामन्यावेळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण पावसामुळे हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं पक्कं होईल. सामना न खेळताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला स्पर्धेबाहेर पडावं लागेल. त्यामुळे पावसाच्या भीतीच्या सावटाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे चाहते आहेत. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं होमग्राऊंड असलेल्या एम चिन्नास्वामी मैदानात होणार आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ फिरत असून अवघ्या 15 मिनिटांत सामना सुरू करण्याचे तंत्रज्ञान चिन्नास्वामी मैदानात बसवण्यात आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
आरसीबी सीएसके सामना सुरु झाल्यानंतर मध्येच पावसाने हजेरी लावली आणि कमी षटकं खेळण्याची वेळ आली तर ग्राऊंड सुकवण्याचं मोठं आव्हान असेल. पण चिन्नास्वामी मैदानावर हे आव्हान फक्त 15 मिनिटात पूर्ण केलं जाणार आहे. त्यामुळे आऊटफिल्ड ओली किंवा खेळपट्टी ओली झाल्याचं कारण सांगून सामना रद्द करण्याची वेळ येणार नाही. कारण कितीही पाऊस आला तरी सामना काही मिनिटांत सुरू करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान या मैदानात आहे.
Chinnaswamy Stadium has the best sub-air drainage and aeration system in the world♥️
Let's hope for the best✌🏻#RCBvCSK #CSKvRCB #RCBvsCSK @RCBTweets pic.twitter.com/cj5h4WIfkf
— Ⓤನೌನ್_ಮಂದಿ💛❤️ (@unknown_trio) May 17, 2024
व्हायरल व्हिडीओत चिन्नास्वामी मैदानातील ड्रेनेज सिस्टम दाखवण्यात आली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमची ड्रेनेज सिस्टम सर्वोत्तम कशी आहे हे या व्हिडिओमध्ये अधोरेखित होत आहे. सब-एअर सिस्टममुळे पाऊस थांबल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत सामना सुरू करता येणार आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान काही कालावधीसाठी पावसाने हजेरी लावली तर टेन्शन घेण्याचं काम नाही. षटकं कमी करून सामना सुरु करता येईल.
या मैदानातील व्हॅक्यूम पॉवर ड्रेनेज सिस्टम प्रत्येक मिनिटाला खेळपट्टीतून 10,000 लिटर पाणी काढून टाकते. गेल्या आयपीएलमध्ये आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता.मुसळधार पाऊस पडून गेल्यानंतर संपूर्ण सामना खेळला गेला. त्यामुळे आता आरसीबी चेन्नई सामन्यात काय स्थिती होते हे काही तासातच स्पष्ट होईल.