आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफसाठी चौथ्या संघासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या वाटेला फलंदाजी आली. आरसीबीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान होतं. हीच बाब लक्षात घेऊन विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र तीन षटकं झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे टेन्शन वाढलं. पण पाऊस जाताच मैदान झटपट सुकवणारी यंत्रणा कामी आली. पण तीन षटकात चांगल्या धावा आल्या होत्या. त्यानंतर खेळपट्टीवर टर्न दिसून आला. त्यामुळे धावांची गती कमी करण्यात चेन्नईला यश आलं. मात्र त्यानंतर विराट कोहलीने आपला आक्रमक अंदाज दाखवला. विराट कोहलीने 29 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. मात्र सँटनरच्या गोलंदाजीवर फटका मारताना शॉट्स हुकला आणि डेरिल मिचेल हाती झेल गेला. कर्णधार फाफ डु प्लेसिसने आपला आक्रमक अंदाज कायम ठेवला. 39 चेंडूत 54 धावांची खेळी केली. त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. पण दुर्दैवाने रजत पाटीदारने समोर मारलेला चेंडू सँटनरच्या हाती लागला थेट स्टंपवर आदळला. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केलं.
रजत पाटीदार आणि कॅमरून ग्रीनने मग डाव पुढे नेला. रजत पाटीदाराने षटकार आणि चौकार मारत संघाला धावसंख्या उभारून देण्यात मदत केली. त्याला कॅमरून ग्रीनची तितकीच साथ मिळाली. ही भागीदारी जमली असताना चेन्नईच्या खेळाडूंनी झेल सोडले. त्याचा फायदा या जोडीने घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नईसमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता चेन्नई सुपर किंग्सला 200 धावांवर रोखण्याचं आव्हान असणार आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे गोलंदाज चेन्नई सुपर किंग्सला धावसंख्येवर रोखणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चेन्नई सुपर किंग्स की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफमध्ये पोहोचणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.