आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने सलग चौथा विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 8 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह किंग कोहलीची शतकी खेळी पाण्यात गेली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 3 गडी गमवून 183 धावा केल्या. तसेच विजयासाठी 184 धावा दिल्या होत्या. हे आव्हान राजस्थान रॉयल्स संघाने 4 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात विराट कोहलीचं शतक संजू सॅमसन आणि जोस बटलरच्या खेळीपुढे व्यर्थ गेलं. जोस बटलरने 58 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 100 धावा केल्या.या विजयासह राजस्थान रॉयल्सने दोन गुणांची कमाई केली आहे. तसेच 8 गुणांसह थेट अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे प्लेऑफच्या दिशेने राजस्थान रॉयल्सने कूच सुरु केली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा हा चौथा पराभव आहे. त्यामुळे या स्पर्धेतील आव्हान आणखी खडतर होत जाणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात निराशाजनक राहिली. यशस्वी जयस्वालला आपलं खातंही खोलता आलं नाही. रिसी टोपलेच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलने त्याचा झेल पकडला. यशस्वीच्या नावावर सिल्व्हर डक कोरला गेला. त्यानंतर जोस बटल आणि संजू सॅमसन यांनी सावध खेळी केली. दुसऱ्या गड्यासाठी या दोघांनी 148 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन 42 चेंडूत 69 धावा करून बाद झाला. त्याने 8 चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्यानंतर आलेल्या रियान परागला काही खास करता आलं नाही. रियान पराग 4 धावा करून बाद झाला. ध्रुव जुरेलही मैदानात आला आणि हजेरी लावून गेला. त्याला फक्त दोन धावा करता आल्या.
विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने बंगळुरुला चांगली सुरुवात करून दिली. 14 षटकात या दोघांनी मिळून 125 धावांची भागीदारी केली. मात्र शेवटच्या चेंडूवर फाफ युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. जोस बटलरने त्याचा झेल घेतला आणि तंबूत पाठवलं. फाफने 33 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल फॉर्मसाठी झुंजताना दिसला. या सामन्यातही तो फेल ठरला आणि 1 धाव करून नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीव त्रिफळाचीत झाला. सौरव चौहानने विराट कोहलीला साथ दिली मात्र काही खास करू शकला नाही. 6 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 9 धावा केल्या चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतरही विराट कोहलीने फटकेबाजी सुरुच ठेवली आणि आणि या पर्वातील पहिलं शतक ठोकलं. 72 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 113 धावा केल्या.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सौरव चौहान, रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.