आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाने सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली. मात्र शेवटच्या टप्प्यात गाडी रुळावरून घसरली आणि एलिमिनेटर फेरी खेळावी लागली. एलिमिनेटर फेरीतही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं पारडं जड होतं. पण राजस्थानने चांगल्या खेळीचं दर्शन घडवलं. आरसीबीने 20 षटकात 8 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थानने 19 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. राजस्थानने 4 गडी आणि एक षटक राखून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर विजय मिळवला. आता 24 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक मैदानात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात क्वॉलिफायर 2 फेरीचा सामना होईल. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने यशाचं गुपित सांगतिलं.
“क्रिकेट आणि जीवन आपल्याला आयुष्याचा चांगल्या आणि वाईट वेळेची अनुभूती देते. पण आपल्यात चांगल्या मार्गावर परतण्याचा आत्मविश्वास असला पाहीजे. मी संघाच्या सांघिक कामगिरीवर खूश आहे. फिल्डिंग, बॅटिंग आणि गोलंदाजीत आम्ही सर्वोत्कृष्ट केलं. खरं सांगायचं तर विजयाचं संपूर्ण श्रेय हे गोलंदाजांचं आहे. ते कायम प्रतिस्पर्धी फलंदाज काय करणार आणि फिल्डिंग कशी लावायची याचा अंदाज घेत होते. याचं श्रेय संगकारा आणि गोलंदाज प्रशिक्षक शेन बॉण्डला जातं. आम्ही या गोष्टीवर हॉटेलमध्ये बरीच चर्चा केली. त्यात अश्विन आणि बोल्टसारखे अनुभवी गोलंदाज होते. त्यामुळे प्रश्नच आला नाही.”, असं राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने सांगितलं.
“माझी तब्येत काही बरी नाही. आमच्या ड्रेसिंग रुममध्ये बरेच जण आजारी आहेत. काही जण खोकत आहेत तर काही जणांना ताप आहे.”, असं संजू सॅमसनने तब्येतीबाबत सांगितलं. “रोवमॅन या सामन्याचा शेवट खूप चांगला केला. मला वाटते आता दिवसभर खूप ट्रॅव्हेल केलं आहे आणि आरामाची गरज आहे. आता पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत.”, असंही संजू सॅमसन याने सांगितलं.