आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एकूण 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय आणि सात सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. सहा गुणांसह मुंबईचा संघ नवव्या स्थानावर आहे. या स्पर्धेत आता चार सामने शिल्लक असून प्लेऑफचं गणित जवळपास फिस्कटलं आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात शेवटचा सामना झाला. हा सामना लखनौ सुपर जायंट्सने चार गडी राखून जिंकला. सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्मा एका वेगळ्याच मूडमध्ये दिसला. रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रोहित शर्मा लखनौ सुपर जायंट्सचा फिरकीपटू अमित मिश्राशी बोलताना दिसत आहे. रोहित शर्माने अमित मिश्राला त्याचं वय विचारलं आणि त्यानंतर त्याने हे चुकीचं असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. इतकंच काय तर रोहित शर्माने अमित मिश्राच्या वयाबाबत मजेशीर उत्तरही दिलं.
रोहित शर्माने अमित मिश्राला विचारलं की, तुझं वय किती आहे. तेव्हा अमित मिश्राने उत्तर दिलं की 40..यानंतर रोहित शर्माने सांगितलं की, “40..कसं काय? तू माझ्यापेक्षा फक्त 3 वर्षे मोठा आहेस..काय मित्रा..जेव्हा लंगोट घालत होतो तेव्हा तू क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.” रोहित शर्माने अमित मिश्राचं वय 40 असल्याचं अमान्य केलं. खरं तर या दोघांमधील हे संभाषण हसतखेळत सुरु होतं. अमित मिश्रा आयपीएलमधील एक यशस्वी गोलंदाज आहे. अमित मिश्राने 162 सामन्यात 174 विकेट्स घेतल्या. त्याचा इकोनॉमी रेड हा 7.38 प्रति षटक आहे.
That ”Arre yaar” felt personal 😂 pic.twitter.com/oZ9nsYZao7
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 1, 2024
अमित मिश्राने एकदा पाच विकेट्स आणि चार वेळा 4 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. अमित मिश्राने तीनवेळा हॅटट्रीक घेतली. हा आतापर्यंत आयपीएलमधील रेकॉर्ड आहे. या पर्वात अमित मिश्रा फक्त एक सामना खेळला आहे आणि एक विकेट घेतला आहे. अमित मिश्राचा हे आयपीएलचं शेवटचं पर्व असू शकते. दुसरीकडे, रोहित शर्माने आयपीएल 2024 स्पर्धेची सुरुवात चांगली केली होती. मात्र त्यानंतर त्याची बॅट शांत झाली आहे. मुंबई इंडियन्स यंदा प्लेऑफमध्ये पोहोचणं खूपच कठीण आहे.