आयपीएल 2024 स्पर्धेतील महत्त्वपूर्ण लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार होती. हा सामना राजस्थान रॉयल्ससाठी खूपच महत्त्वाचा होता. स्पर्धेत एकदम धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या राजस्थानचा शेवट मात्र वाईट झाला. कारण टॉपला असणाऱ्या राजस्थानला आता प्लेऑफमध्ये एलिमिनेटर फेरी खेळावी लागणार आहे. सुरुवातीला विजयाची चव चाखल्यानंतर राजस्थानची गाडी रुळावरून घसरली. सलग चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर टॉप 2 मध्ये राहण्यासाठी आजच्या सामन्यातील विजय महत्त्वाचा होता. मात्र त्यावर पावसाचं पाणी फेरलं गेलं आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला खरा..पण राजस्थान रॉयल्सला टॉप 2 मध्ये स्थान मिळालं नाही. त्यामुळे सलग चार पराभवाचा फटका राजस्थान रॉयल्सला बसला आहे. आता एलिमिनेटर फेरीत राजस्थानची गाठ ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होणार आहे. राजस्थानला बंगळुरुचं कडवट आव्हान असणार आहे. कारण बंगळुरुने आतापर्यंत सलग सहा सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे राजस्थानचं सलग चार सामन्यात पराभव आणि शेवटचा पावसामुळे वाया गेल्याने मनोबल खचलं आहे. त्याचा फायदा काही अंशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु घेऊ शकते.
दुसरीकडे, हा सामना रद्द झाला तरी कोलकाता नाईट रायडर्स काहीही फरक पडलेला नाही. गुणतालिकेत टॉपचं स्थान कायम आहे. त्यामुळे प्लेऑफचा एक सामना खेळून थेट अंतिम फेरी गाठता येणार आहे. प्लेऑफमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना 21 मे रोजी होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायसीनेही दोनदा जेतेपद मिळवलं आहे. यापूर्वी या फ्रेंचायसीचं नाव डेक्कन चार्जर्स होतं. त्यामुळे दोन्ही संघांना तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे.
राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2008 मध्ये पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आतापर्यंत जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. आयपीएलच्या 15 पर्वात दुष्काळ आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आपल्या पहिल्या जेतेपदासाठी अजूनही आतुरलेली आहे. त्यामुळे आता कोण जेतेपद मिळवतं याची उत्कंठा वाढली आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 22 मे रोजी सामना होणार आहे.