आयपीएल 2024 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आहेत. राजस्थानचा संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. नाणेफेकीचा कौल जिंकताच राजस्थान रॉयल्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. संजू सॅमसनने दुसऱ्या डावातील दव पडेल याचा अंदाज घेतला आणि गोलंदाजी निवडली. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासूनच पंजाब किंग्सवर दबाव टाकला होता. दोन तीन चौकार मारूनही हा दबाव काही दूर गेला नाही. पॉवर प्लेमध्ये हव्या तशा धावा आल्या नाहीत. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात पंजाब किंग्सला काही यश आलं नाही. शेवटच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातही काही लय नव्हती. त्यामुळे पंजाबचा संघ 20 षटकात 8 गडी गमवून 147 धावा करू शकला. पंजाबने विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान राजस्थान रॉयल्स कसं गाठतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
पंजाबकडून कोणीही मोठी खेळी करू शकलं नाही. आघाडीला आलेल्या अथर्व तायडे आणि जॉनी बेअरस्टोने सावध सुरुवात केली. पण त्याला काहीच अर्थ नव्हता. टी20 क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजीची आवश्यकता असताना गोलंदाजांना स्फुरण मिळत गेलं. 27 धावा असताना अथर्व तायडेच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्याने 15 धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने 15, प्रभसिमरन सिंगने 10, सॅम करनने 6, जितेश शर्माने 29, शशांक सिंगने 9 धावा करून बाद झाले. केशव महाराज आणि आवेश खानने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी एक गडी बाद केला.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.