आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स पुन्हा एकदा विजयाचा ट्रॅकवर परतला आहे. आयपीएलमध्ये सुरुवातीचे चार सामने जिंकल्यानंतर गुजरातने विजय रथ रोखला होता. आता सहाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा 3 विकेट्स राखून धुव्वा उडवला. खरं तर या सामन्यात पंजाब किंग्सने चांगलीच लढत दिली. शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने अव्वल स्थान आणखी घट्ट केलं आहे. गुणतालिकेत 10 गुणांसह राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर कायम आहे. आता राजस्थान रॉयल्सची प्लेऑफच्या दिशेने कूच सुरु झाली आहे. उर्वरित 8 सामन्यापैकी 3 सामने जिंकले की प्लेऑफचं स्थान निश्चित होईल. दरम्यान, पंजाब किंग्सने 20 षटकात 8 गडी गमवून 147 धावा केल्या आणि विजयासाठी 148 धावा दिल्या. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने गडी गमवून पूर्ण केलं. या पराभवामुळे पंजाब किंग्सचं स्पर्धेतील आव्हान आणखी कठीण झालं आहे.
पंजाब किंग्सने विजयासाठी दिलेल्या 148 धावांचा पाठलाग करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि तनुष कोटियन ही जोडी मैदानात उतरली. या सामन्यात यशस्वी जयस्वाल इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरला होता. गेल्या काही सामन्यात त्याला सूर गवसत नव्हता. मात्र या सामन्यात त्याने फलंदाजी केली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी मिळून 56 धावांची भागीदारी केली. त्यानंतर लियाम लिविंगस्टोनच्या गोलंदाजीवर कोटियन बाद झाला. त्याने 31 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. त्यानंतर त्याची जागा संजू सॅमसनने घेतली. त्यानंतर यशस्वी जयस्वाल 39 धावा करून बाद झाला. संजू सॅमसन 18, रियान पराग 23, ध्रुव जुरेल 6, रोवमॅन पॉवेल 11 आणि केशव महाराज 1 धाव करून बाद झाले. तर शिम्रोन हेमायरने 10 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 27 धावा केल्या आणि विजय मिळवून दिला.
राजस्थान रॉयल्सकडून आवेश खान आणि केशव महाराज हे यशस्वी गोलंदाज ठरले. त्यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.