आयपीएलच्या 17 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. आरसीबीने राजस्थानला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानने हे आव्हान 19 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. राजस्थानच्या या विजयात प्रत्येक फलंदाजाने योगदान दिलं. आता राजस्थानचा क्वालिफायर 2 मध्ये फायनलसाठी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुकाबला होणार आहे. तर आरसीबीची पराभवामुळे चॅम्पियन होण्याची प्रतिक्षा आणखी एका वर्षाने वाढली.
राजस्थान विरुद्ध आरसीबी सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केलं. विराट कोहलीने पराभवानंतरही मनाचा मोठेपणा दाखवून हसतमुखाने प्रतिस्पर्धी राजस्थानच्या प्रत्येक खेळाडूंचं अभिनंदन करत पुढील सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या. हस्तांदोलनादरम्यान क्रिकेट चाहत्यांना एक भावनिक क्षण मैदानात पाहायला मिळाला. आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीने दिनेश कार्तिकला घट्ट मीठी मारली. या वेळेस विराट आणि कार्तिक दोघेही भावूक झालेले. आता दोघेही पुन्हा खेळाडू म्हणून क्रिकेटच्या मैदानात एकत्र दिसणार नाहीत, याची जाणीव या फोटोतून प्रत्येक क्रिकेट चाहत्याला जाणवली. दोघांना पाहून क्रिकेट चाहतेही भावूक झाले.
दिनेश कार्तिकने आयपीएलच्या इतिहासात विकेटकीपर, बॅट्समन, कर्णधार अशा अनेक भूमिका सार्थपणे बजावल्या. कार्तिकने स्पर्धेच्या इतिहासात एकूण 6 संघाचं प्रतिनिधित्व केलं. कार्तिक दिल्ली, पंजाब, मुंबई, गुजरात (लायन्स), कोलकाता आणि बंगळुरुकडून खेळला. कार्तिकने 257 सामन्यांमधील 234 डावांमध्ये 135.36 स्ट्राईक रेट आणि 26.32 च्या सरासरीने 22 अर्धशतकं, 161 सिक्स आणि 466 चौकारांच्या मदतीने 4 हजार 842 धावा केल्या. कार्तिकची 97 ही सर्वोच्च धावसंख्या राहिली. आता कार्तिक मैदानात पुन्हा दिसणार नाही, हा विचारही प्रत्येक क्रिकेट चाहत्याला नकोसा वाटणारा आहे.
विराट-कार्तिकची गळाभेट
Virat Kohli giving a Farewell hug to Dinesh Karthik from IPL. ❤️ pic.twitter.com/TZXQvl3EOQ
— Johns. (@CricCrazyJohns) May 22, 2024
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकटेकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.