मुंबई | भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20 मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर टीम इंडियाने केएल राहुलच्या कॅप्टन्सीत एकदिवसीय मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर या मालिकेतील दुसरा सामना हा मंगळवारी 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. याच दिवशी आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठीचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात 77 जागांसाठी 333 खेळाडू मैदानात आहे. यामध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे या खेळाडूंना आपल्या गोटात घेण्यासाठी 10 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. ऑक्शनची लगबग असताना आता दुसऱ्या बाजूला आयपीएलच्या आगामी मोसमाच्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
आयपीएल 2024 च्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर केव्हा होणार, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने 17 व्या मोसमाच्या वेळापत्रकाबाबत घोषणा केली आहे.
त्यामुळे सामने कोणत्या तारखेला होणार, कुठे होणार, किती वाजता सुरु होणार या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तर क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहेत.
देशात अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. अशात निवडणूक आयोगाकडे लक्ष लागलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतरच आयपीएलचं वेळापत्रक जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.
आता वेळापत्रकानंतर क्रिकेट चाहत्यांना असाही प्रश्न आहे की 17 व्या मोसमातील सामने भारतात होणार की बाहेर? 2009 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे आणि कोरोनामुळे आयपीएलच्या काही मोसमाचं आयोजन हे परदेशात करण्यात आलं होतं. 2009 साली लोकसभा निवडणुकांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल परदेशात आयोजित करण्यात आलं होतं. यंदाही निवडणुका आहेत. त्यामुळे आयपीएल भारतात होणार की बाहेर, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान आयपीएल 2024 केव्हा सुरु होणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 17 व्या मोसमाला मार्च महिन्यातील तिसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होऊ शकते.