सनरायजर्स हैदराबादने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये धमाका करत राजस्थान रॉयल्सवर क्वालिफायर 2 सामन्यात 36 धावांनी विजय मिळवला. हैदराबादने या विजयासह राजस्थाचं पॅकअप केलं. तर हैदराबाद विजयासह अंतिम फेरीत पोहचली आहे. अंतिम सामना हा 26 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे.या हंगामातील क्वालिफायर 2 सामना हा हैदराबाद विरुद्ध राजस्थान यांच्यात पार पडला. राजस्थानने या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 175 धावांपर्यंत झेप घेतली. तर राजस्थानला 7 विकेट्स गमावून 139 धावाच करता आल्या.
राजस्थानच्या पराभवानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेनशनमध्ये कॅप्टन संजून सॅमसन याला वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजू सॅमसन याने उत्तर दिलं. “मी संदीपसाठी फार आनंदी आहे. ऑक्शनमध्ये त्याला कुणीही घेतलं नाही. मात्र त्यानंतर संदीप शर्मा राजस्थान टीममध्ये बदली खेळाडू म्हणून जोडला गेला. संदीप शर्मा याने शानदार कामगिरी केली. जर संदीपची आकडेवारी पाहिलीत, तर जसप्रीत बुमराहनंतर त्याचाच नंबर आहे. संदीपची इकॉनॉमी आणि इतर सर्व बाबी उल्लेखनीय आहेत”, असं संजू सॅमसन याने म्हटलं.
दरम्यान संदीप शर्मा याने क्वालिफायर 2 सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध घातक सलामीवीर ट्रेव्हिस हेड याला आऊट केलं. संदीपने एकूण 4 ओव्हरमध्ये 25 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. संदीपने या हंगामातील एकूण 11 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या. संदीपची 18 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी राहिली.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडेन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयसवाल, टॉम कोहलर-कैडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमैन पॉवेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल.