Rohit vs Hardik : रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात कर्णधार म्हणून बेस्ट कोण? जाणून घ्या आकडेवारी

| Updated on: Mar 12, 2024 | 1:24 PM

आयपीएल 2024 स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेपूर्वी फ्रेंचायसीमध्ये अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. खासकरून मुंबई इंडियन्सनने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवलं. त्यामुळे चांगल्या वाईट प्रतिक्रिया समोर आल्या. चला जाणून आकडेवारीनुसार कोण बेस्ट ते

Rohit vs Hardik : रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात कर्णधार म्हणून बेस्ट कोण? जाणून घ्या आकडेवारी
Follow us on

मुंबई : आयपीएलचं हे 17वं पर्व असून दहा संघ या स्पर्धेसाठी सज्ज आहेत. असं असताना मुंबई इंडियन्स संघाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. कारण या स्पर्धेत मुंबई इंडियन्स वरचष्मा राहिला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यात मुंबई इंडियन्सचा एक वेगळाच फॅन बेस आहे. पण आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स संघात बरीच उलथापालथ झाली आहे. मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीने रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्यावर विश्वास टाकला आहे. गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला ट्रेड विंडोतून 15 कोटी रुपये खर्च करून घेतलं आणि थेट कर्णधारपदाची माळ गळ्यात घातली. यामुळे मुंबई इंडियन्सचे फॅन्स काही अंशी नाराज आहेत. तर काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मुंबई इंडियन्सने 17 वर्षात बऱ्याच घडामोडी पाहिल्या आहेत. पहिल्या पाच पर्वात तर मुंबई इंडियन्स कुठेच नव्हती. मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्सचा बोलबाला पाहायला मिळाला.

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आठ कर्णधार पाहिले आहेत. तसेच हार्दिक पांड्या हा नववा कर्णधार आहे. आयपीएलच्या सुरुवातीला सचिन तेंडुलकरकडे संघाची धुरा होती. 2008 ते 2011 या कालावधीत सचिन तेंडुलकर हा कर्णधार होता. दरम्यान सचिनच्या अनुपस्थितीत हरभजन सिंग, शॉन पॉलॉक ड्वेन ब्राओ यांनी धुरा सांभाळली. त्यानंतर 2013 मध्ये रिकी पॉटिंगकडे कर्णधारपद सोपण्यात आलं. मात्र तेथेही अपयश असल्याने फ्रेंचायसीने रोहित शर्मावर विश्वास टाकला. 2013 पासून 2023 पर्यंत रोहित शर्मा कर्णधार होता. त्या कालावधीत रोहितच्या अनुपस्थितीत किरोन पोलार्ड, सूर्यकुमार यादव यांनी सूत्र हाती घेतली होती. आतापासून ही सूत्र हार्दिक पांड्याच्या हाती असणार आहेत.

आयपीएल इतिहासात रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू आहे. त्याने एकूण 6211 धावा केल्या आहेत. तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्यान 3986 धावा केल्या आहेत. त्याच्या कारकिर्दित मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2013 मध्ये मुंबई इंडियन्सने जेतेपदावर पहिलं नाव कोरलं. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला 23 धावांनी पराभूत केलं. त्यानंतर 2015, 2017, 2019 आणि 2020 साली जेतेपदावर नाव कोरलं. विशेष म्हणजे 2015 साली हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सकडून प्रवासाला सुरुवात केली.

2021 नंतर मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला रिलीज केलं. 2022 स्पर्धेत गुजरात टायटन्सने आपल्या संघात समाविष्ट केलं आणि संघाचं कर्णधारपद सोपवलं. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात पहिल्याच फटक्यात गुजरातने जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर 2023 च्या पर्वात अंतिम फेरी गाठली. पण चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामन्यात 5 विकेट्स राखून पराभूत केलं.

रोहित शर्माच्या नेतृत्वात संघ 158 सामने खेळला आहे. त्यापैकी 87 सामन्यात विजय आणि 67 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाची विजयी टक्केवारी ही 55.06 टक्के इतकी आहे. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात 31 सामने खेळले असून 22 सामन्यात विजय आणि 9 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाची विजयी टक्केवारी 70.97 टक्के इतकी आहे. त्यामुळे विजयी टक्केवारीच्या गणितात हार्दिक पांड्या हा रोहित शर्मापेक्षा वरचढ ठरत आहे. पण रोहित शर्मा असलेला नेतृत्वाचा अनुभव आणि पाच जेतेपद हे हार्दिकपेक्षा उजवे ठरत आहेत. त्यामुळे कोण बेस्ट हे या पर्वात समोर येईलच.