आयपीएल लिलावात 13 वर्षाच्या मुलाने खाल्ला 1.1 कोटींचा भाव, राहुल द्रविडने टाकला विश्वास

| Updated on: Nov 25, 2024 | 10:53 PM

आयपीएल 2025 लिलावात सर्वांचं लक्ष लागून होते ते 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर... 13 व्या वर्षी वैभवने आपलं नाव आयपीएलसाठी नोंदवलं होतं. पण त्याच्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली.

आयपीएल लिलावात 13 वर्षाच्या मुलाने खाल्ला 1.1 कोटींचा भाव, राहुल द्रविडने टाकला विश्वास
Follow us on

आयपीएल लिलावात काही खेळाडूंची चांदी झाली, तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. असं असताना शेवटच्या टप्प्यात नाव आलं ते 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं.. 13वं वर्षात 140 किमी वेगाने येणारा चेंडूचा सामना करणं म्हणजे कठीणच.. पण बिहारमधून येणाऱ्या या खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. वैभवने जानेवारी 2024 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वैभवने पहिला सामना मुंबईविरुद्ध खेळला होता. त्याने तेव्हा दोन डावात 31 धावा केल्या होत्या. त्यानंतर बिहारसाठी रणजी ट्रॉफी खेळणारा दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरला होता. आता बिहारसाठी 5 सामन्यातील 10 डावात त्याने 100 धावा केल्या आहेत. 41 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. नुकतंच अंडर 19 कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकलं होतं. कसोटीच्या पहिल्या डावात 104 धावा केल्या आणि भारताच्या विजयात योगदान दिलं.वैभव सूर्यवंशी हा डावखुरा फलंदाज आहे आणि त्याची फटकेबाजी पाहून संघात असावा असा फलंदाज आहे.

आयपीएल 2025 मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीची बेस प्राईस 30 लाख रुपये होती. 68 व्या सेटमध्ये त्यांचं नाव होतं. 491 वा खेळाडू म्हणून ऑक्शनरने त्याच्या नावाची घोषणा केली. त्याचं नाव घोषित होताच राहुल द्रविड प्रशिक्षक असलेल्या राजस्थान रॉयल्सने पेडल उचललं. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनेही त्याच्यासाठी जोर लावला. बघता बघता त्याची किंमत 1 कोटीपर्यंत गेली. दिल्लीने ही बोली लावली होती. पण राहुल द्रविडने व्यवस्थापनाला समजावलं आणि 1 कोटी 10 लाखांची बोली लावली. इतकी मोठी बोली पाहता दिल्ली कॅपिटल्सने काढता पाय घेतला. वैभव सूर्यवंशी राजस्थानच्या पारड्यात गेला.

ईएसपीएन क्रिकइंफोच्या माहितीनुसार, वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011 मध्ये झाला आहे. त्याची आता वय 13 वर्षे 245 दिवस (25 नोव्हेंबर 2024) आहे. वैभवचा जन्म समस्तीपूरच्या मोतीपूरमध्ये झाला आहे. वैभवला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच वैभव फलंदाजी करत होता. त्याच्यासाठी वडिलांनी घरीच नेट लावलं होतं. त्यानंतर वैभव समस्तीपूरच्या क्रिकेट अकादमीत सहभागी झाला. तिथे वैभवने पटणाच्या जीसस अकादमीतून मनिष ओझाकडून ट्रेनिंग घेतली.