श्रेयस अय्यरला शेवटच्या षटकात का स्ट्राईक दिली नाही? शशांक सिंगने सांगून टाकलं खरं काय ते

| Updated on: Mar 25, 2025 | 10:33 PM

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्याच सामन्यात धमाकेदार खेळी केली. त्याने 42 चेंडूत नाबाद 97 धावांची खेळी केली. त्याचं शतक अवघ्या 3 धावांनी हुकलं. त्याला कारण ठरला तो शशांक सिंग.. पण त्याने त्यामागचं कारण सांगून टाकलं. नेमकं काय झालं ते...

श्रेयस अय्यरला शेवटच्या षटकात का स्ट्राईक दिली नाही? शशांक सिंगने सांगून टाकलं खरं काय ते
श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग
Image Credit source: Punjab Kings Twitter
Follow us on

आयपीएलचा पाचवा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होता. या सामन्यातील पहिल्या डावात पंजाब किंग्सकडून कर्णधार श्रेयस अय्यरने वादळी खेळी केली. त्याने 42 चेंडूत नाबाद 97 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 6 षटकार आणि पाच चौकार मारले. खरं तर त्याचं शतक सहज पूर्ण होऊ शकलं असतं. कारण शेवटचं षटक बाकी होतं आणि स्ट्राईकला शशांक सिंग होता. त्याने एक धाव काढली असती आणि स्ट्राईक मिळाला असता तर श्रेयसने शतक पूर्ण केलं असतं. मोहम्मद सिराज शेवटचं षटक टाकत असताना प्रत्येकाची अशीच इच्छा होती की श्रेयसला स्ट्राईक मिळावी. पण शेवटच्या षटकाचा एकही चेंडू श्रेयसच्या वाटेला आला नाही. सहाच्या सहा चेंडू शशांक एकटा खेळला आणि 23 धावा काढल्या. यामुळे श्रेयसचं शतक तीन धावा कमी पडल्याने राहिलं. पहिला डाव संपल्यानंतर शशांकला समालोचकांनी त्याच्या खेळीबाबत विचारलं. तेव्हा त्याने मैदानात नेमकं काय घडलं ते सांगितलं. कर्णधार अय्यरकडून पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळण्याचे आदेश मिळाले होते. तसेच शतकाबाबत विचार करू नको असं सांगितलं होतं.

शशांक सिंग म्हणाला की, “हा एक चांगला कॅमिओ होता. श्रेयस ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता ते अद्भुत होतं. मी डगआउटमधून त्याला पाहत होतो. मी मैदानावर येताच श्रेयसने मला पहिल्याच चेंडूपासून मोठे शॉट्स खेळण्यास सांगितले. त्याने मला सांगितले की माझे शतक पाहू नका आणि फक्त शॉट्स खेळा. मी फक्त चेंडूकडे पाहत होतो आणि तो मारत होतो. मी चौकार शोधत होतो. मी ज्या स्थितीत फलंदाजी करतो त्या स्थितीत खेळण्यासाठी संघ आणि व्यवस्थापनाने मला पाठिंबा देणे आवश्यक होते. मी माझे शॉट्स पूर्ण स्वातंत्र्याने खेळण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या ताकदीला पाठिंबा देतो.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), साई सुधारसन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा