IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्सला अडचणीत आणणाऱ्या विघ्नेश पुथूरला धोनीने काय सांगितलं? सगळं काही झालं उघड

| Updated on: Mar 25, 2025 | 3:54 PM

आयपीएलच्या 18व्या विघ्नेश पुथूरची जोरदार चर्चा होत आहे. खरं तर नवख्या विघ्नेशने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याच्या या खेळीने सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा धोनीही त्याच्या कामगिरीने प्रभावित झाला. त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवून गुरूमंत्र दिला. त्याचा खुलासा आता झाला आहे.

IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्सला अडचणीत आणणाऱ्या विघ्नेश पुथूरला धोनीने काय सांगितलं? सगळं काही झालं उघड
Image Credit source: video grab
Follow us on

आयपीएल 2025 स्पर्धेत नवे तारे चमकले आहेत. काही खेळाडूंनी केलेली कामगिरी पाहून क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मुंबई इंडियन्सचा युवा फिरकीपटू विघ्नेश पुथूरने आयपीएल पदार्पणाच्या सामन्यातच कमाल केली. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात 155 धावा रोखण्यासाठी मुंबईने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून विघ्नेश पुथूरचं अस्त्र वापरलं. हे अस्त्र प्रभावी ठरलं. त्यामुळे 155 धावा गाठण्यासाठी चेन्नईला 20 व्या षटकापर्यंत लढा द्यावा लागला. त्याच्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यात महेंद्रसिंह धोनीचं सुद्धा नाव आहे. सामना संपल्यानंतर धोनीने विघ्नेशच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्याशी बोलताना दिसला. त्यामुळे धोनीने विघ्नेशला काय कानमंत्र दिला याची उत्सुकता होती. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने अंदाज बांधत होता. पण याबाबत थेट खुलासा आता विघ्नेशने केला आहे. धोनी आणि त्याच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत त्याने सांगितलं आहे.

विघ्नेश पुथूरने सांगितलं की, ‘धोनीने मला विचारलं की तुझं वय किती आहे आणि सांगितलं की आता तेच काम करायचं ज्यासाठी आयपीएलमध्ये आला आहेस.’ चेन्नई सुपर किंग्सने 23 मार्चला झालेल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमवून 155 धावा केल्या. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने 19.1 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. यात विघ्नेनशे 3 षटकं टाकली आणि 32 धावा देत तीन गडी बाद केले. यात विघ्नेशने कर्णधार ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुड्डा यांना बाद केलं.

मुंबई इंडियन्सची या स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली. मागच्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स पहिला सामना जिंकण्यात अपयशी ठरली आहे. यापूर्वी पहिला सामना 2012 मध्ये जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत पराभवाची मालिका सुरु आहे. आता मुंबईला स्पर्धेत परतण्यासाठी विजयाच्या ट्रॅकवर यावं लागेल. कारण एकदा गाडी पराभवाच्या रुळावर गेली तर त्यातून कमबॅक करणं कठीण होईल. मागच्या पर्वात त्याची अनुभूती मुंबई इंडियन्सला आली आहे.