IPL 2025, RCB vs CSK : आरसीबी 17 वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवणार? जाणून घ्या जमेची बाजू

| Updated on: Mar 27, 2025 | 7:48 PM

आयपीएलमधील आरसीबी आणि सीएसके यांच्यातील महत्त्वाचा सामना चेन्नईमध्ये होणार आहे. आरसीबी चेपॉकवरील सीएसकेचे 17 वर्षांचे वर्चस्व मोडण्याचा प्रयत्न करेल. फिरकीपटूंना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर दोन्ही संघांचे फलंदाज कशा प्रकारची कामगिरी करतील हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

IPL 2025, RCB vs CSK : आरसीबी 17 वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवणार? जाणून घ्या जमेची बाजू
Follow us on

आयपीएल 2025 स्पर्धेत दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत . आरसीबी आणि सीएसके या दोन्ही संघांमधील सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून आरसीबी 17 वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सही विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. खरं तर, आरसीबीने आतापर्यंत चेपॉक स्टेडियमवर फक्त एकदाच चेन्नई सुपर किंग्सला हरवले आहे. 2008 मध्ये झालेल्या पहिल्या आयपीएलमध्ये आरसीबीने सीएसकेला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवले होते. या व्यतिरिक्त आरसीबीला चेन्नईमध्ये एकही सामना जिंकता आलेला नाही. आरसीबीला विजयाचे स्वप्न साकार करणे वाटते तितकं सोपे नाही. कारण चेन्नई संघाने नेहमीच घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवले आहे. विशेषतः फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर चेन्नईला हरवणे सोपे नसेल.

चेन्नईकडे रवींद्र जडेजा आणि आर अश्विनसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. गेल्या वर्षीच्या लिलावात रविचंद्रन अश्विनला खरेदी करण्यात आले होते. अफगाणिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज नूर अहमदचाही संघात समावेश करण्यात आला आहे. या तिघांनी अलीकडेच मुंबई इंडियन्सविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या फिरकीपटूंनी मुंबईविरुद्ध 11 षटकांत फक्त 70 धावा देत 5 बळी घेतले.

विराट कोहली एकटा सीएसकेच्या गोलंदाजीला हरवू शकत नाही. त्याला फिल साल्ट, कर्णधार रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा सारख्या फलंदाजांकडून साथ आवश्यक आहे. आरसीबी संघ व्यवस्थापन टिम डेव्हिडच्या जागी जेकब बेथॉलला खेळवण्याचा विचार करू शकते. गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या तंदुरुस्तीवर संघ लक्ष ठेवेल. जर तो तंदुरुस्त असेल तर भुवी रसिक सलामच्या जागी खेळेल.

दोन्ही संघाचे खेळाडू

चेन्नई सुपर किंग्ज संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथिराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुरजनप्रीत सिंग, नाथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्णन घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल साल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिखारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.