आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठीचं (IPL 2025) ऑक्शनकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. यंदा मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंसह फ्रँचायजींचं मेगा ऑक्शनच्या तारखेकडे लक्ष आहे. मात्र त्याआधी एकूण 10 फ्रँचायजींना रिटेन आणि रीलीज अर्थात कायम केलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या नियमांनुसार, प्रत्येक संघ जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम ठेवू शकते. याआधी आयपीएलच्या सतराव्या हंगामात (IPL 2024) उपविजेता राहिलेल्या सनरायजर्स हैदराबादच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनरायजर्स हैदराबादच्या टॉप 3 खेळाडूंमध्ये 2 परदेशी आणि 1 भारतीय खेळाडूचा समावेश आहे. सनरायजर्स हैदराबाद एका खेळाडूला संघात कायम ठेवण्यासाठी 23 कोटी रुपये मोजणार असल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद टीम ही रक्कम कॅप्टन पॅट कमिन्स किंवा स्टार ओपनर ट्रेव्हिस हेड यांना नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रिक क्लासेन याला देणार असल्याची चर्चा आहे. हैदराबादची हेन्रिक क्लासेन रिटेन करण्यासाठी पहिली पसंत आहे.
हैदराबादने पॅट कमिन्स याला गेल्या हंगामात 20 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलेलं. पॅट यासह आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पॅट कमिन्सने आपल्या नेतृत्वात हैदराबादला अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं. मात्र अखेरच्या क्षणी ट्रॉफीने हुलकावणी दिली होती. मात्र त्यानंतरही हैदराबाद पॅटला जास्तीची रक्कम देऊन संघात कायम ठेवण्यासाठी इच्छूक नसल्याचं म्हटलं जातंय.
ईसपीएन-क्रिकइन्फोच्या रिपोर्ट्सनुसार, क्लासेन हैदराबादची पहिली पसंत आहे. क्लासेनने गेल्या हंगामात 171 च्या स्ट्राईक रेटने 479 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला पॅट कमिन्सला गेल्या वर्षाच्या तुलनेत 2 ते 2.50 कोटी रुपये कमी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, हैदराबाद पॅटसाठी 18 कोटी रुपये खर्च करु शकते. तसेच पॅटलाच कॅप्टन म्हणून कायम ठेवणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
टीम इंडियाचा युवा खेळाडू अभिषेक शर्मा हा रिटेन करण्याबाबत हैदराबादची तिसरी पसंत असल्याचं म्हटलं जात आहे. अभिषेकने गेल्या हंगामात 204 च्या स्ट्राईक रेटने 42 सिक्ससह 484 धावा केल्या होत्या. तर क्लासेन आणि अभिषेकच्या तुलनेत एकट्या ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक 567 धावा केल्या होत्या. पॅट कमिन्स टीमची पहिली पसंत असेल आणि त्याला सर्वातआधी रिटेन करण्यासाठी आग्रही असेल, असं म्हटलं जात होतं. मात्र हैदराबादने क्लासेनला आधी प्राधान्य दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हैदराबाद हेडलाही कायम ठेवेल, मात्र त्याला आहे त्याच किंमतीत ठेवणार की त्यात कपात करणार? याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.