आयपीएल 2025 स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच बरीच उलथापालथ होताना दिसत आहे. ऐन स्पर्धेच्या तोंडावर काही खेळाडूंनी माघार घेतली, तर काही खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने खेळणार नाही. काही जणांचं नशिब चमकलं आणि आयपीएल खेळण्याची संधी चालून आली. काही जणांना नकळतपणे कर्णधारपद मिळालं. असे एक ना अनेक गोष्टी आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापू्र्वी घडल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे राजस्थान रॉयल्सचं सुरुवातीच्या तीन सामन्यांचं कर्णधारपद युवा रियान परागला मिळालं आहे. संजू सॅमसन दुखापतग्रस्त असल्याने रियान पराग ही भूमिका बजावणार आहे. तर संजू सॅमसन सुरुवातीच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार आहे. मात्र कर्णधारपद भूषवणार नाही. त्यामुळे पहिल्या तीन सामन्यात रियान परागला संघाला विजयी स्टार्टअप देण्याची जबाबदारी असणार आहे. कर्णधारपद खांद्यावर आल्यानंतर रियान परागने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सोशल मीडियावर त्याने आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट काय ते सांगून टाकलं आहे.
‘काही सामन्यात एक लीडर म्हणून मोठी भूमिका बजवावी लागणार आहे. मी या आव्हानासाठी सज्ज आहे.’ असं सांगत रियान परागने संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्सला टॅग केलं आहे. तसेच हृदयाचा इमोजी टाकला आहे. रियान पराग 2019 पासून आयपीएल खेळत आहे. आतापर्यंत आयपीएलच्या 70 सामन्यात 1173 धावा केल्या आहेत. यात 6 अर्धशतकांचा समावेस आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक स्कोअर हा 84 धावा आहेत. रियान पराग भारतीय संघासाठी एक वनडे आणि 9 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.
आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या जेतेपदाचा मान राजस्थान रॉयल्सला मिळाला आहे. 2008 साली पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं. मात्र तिथपासून आतापर्यंत झोळी रिती आहे. आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने अंतिम फेरी गाठली होती. पण गुजरात टायटन्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. राजस्थान रॉयल्स आतापर्यंतच्या 18 पर्वात सात कर्णधार बघितले आहे. यात संजू सॅमसन, शेन वॉर्न, राहुल द्रविड, शेन वॉटसन, स्टीव्ह स्मिथ आणि अजिंक्य रहाणे यांचं नाव आहे. तर रियान पराग हा सातवा कर्णधार आहे. राजस्थानसाठी सर्वाधिक 61 सामन्यात संजू सॅमसनने कर्णधारपद भूषवलं आहे.