आयपीएल आगामी 18 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनआधी काही दिवसांपूर्वी एकूण 10 फ्रँचायजींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. त्यानंतर आता सर्व क्रिकेट चाहत्यांना आणि रिलीज करण्यात आलेल्या खेळाडूंना मेगा ऑक्शनची प्रतिक्षा लागून राहिली आहे. या मेगा ऑक्शनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मेगा ऑक्शन कधी आणि कुठे होणार याबाबतचं संभावित ठिकाण आणि तारीख समोर आली आहे. स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, मेगा ऑक्शन रियाध येथे होणार आहे. मात्र याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेगा ऑक्शन नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मेगा ऑक्शन नोव्हेंबर महिन्यातील 24 तारखेला होण्याची शक्यता आहे.
यंदा आयपीएला मेगा ऑक्शन होत आहे. त्यात सर्व फ्रँचायजींनी अनेक खेळाडूंना करारमुक्त केले आहेत. त्यामुळे या खेळाडूंना आपल्या गोटात घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. श्रेयस अय्य, ऋषभ पंत, केएल राहुल, मिचेल स्टार्क,मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, ग्लेन मॅक्सवेल, इशान किशन आणि इतर मोठ्या खेळाडू ऑक्शनमध्ये असणार आहे. आता या खेळाडूंना कोणती टीम आपल्या गोटात घेण्यात यशस्वी ठरणार? आणि त्या खेळाडूंना किती रक्कम मिळणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
आयपीएल रिटेन्शमध्ये अनेक फ्रँचायजींनी कर्णधारांना करारमुक्त केलं आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिट्ल्स, लखनऊ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्ससह अनेक संघ हे कर्णधारांच्या शोधात असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला रिटेन्शनद्वारे ध्रुव जुरेल, रिंकु सिंह, मथीशा पथीराणा यासह अनेक खेळाडू हे मालामाल झाले. ध्रुव जुरेल याला 14 कोटींमध्ये रिटेन करण्यात आलं आहे. ध्रुवला 20 लाखात संघात घेतलं गेलं होतं.
दुसऱ्या बाजूला 55 लाखांवर समाधानी असलेला रिंकु सिंह मालामाल झाला. रिंकुला केकेआरने 13 कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात आलं आहे. श्रीलंकेच्या मथीशा पथिराणा याला 13 कोटींसह कायम ठेवण्यात आलं आहे. तर मयंक यादव आणि रजत पाटीदार या दोघांना 20 लाखात संघामध्ये घेतलं गेलं होतं. मात्र या दोघांना आता प्रत्येकी 11 कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात आलं आहे.