आयपीएल 2025 स्पर्धेचे वेध आतापासूनच लागले आहेत. यापूर्वीचं वेळापत्रक पाहता स्पर्धेसाठी सात महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. तत्पूर्वी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे फ्रेंचायझींमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. काही खेळाडू रिटेन केले जातील. पण काही खेळाडूंना इच्छा नसताना सोडावं लागणार आहे. यासाठी कोट्यवधि रुपयांची बोली लागेल. एखाद्या खेळाडूला संघात घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळेल. दुसरीकडे, इम्पॅक्ट प्लेयर नियम रद्द केला जाण्याची शक्यता आहे. असं असताना आणखी एक बातमी समोर आली आहे. आगामी आयपीएलमध्ये 74 ऐवजी 84 सामने खेळले जातील, असं सांगण्यात येत आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2025 आणि 2026 मध्ये 84 सामने आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे साखळी फेरीत आणखी 10 सामने वाढतील. दहा संघ असल्याने प्रत्येकाच्या वाटेला आणखी दोन सामने येतील. याचाच अर्थ असा की साखळी फेरीत प्रत्येक 14 ऐवजी 16 सामने होतील. यामुळे बाद फेरीचं गणित बदलणार आहे. टॉप चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांना अतिरिक्त दोन सामन्यांची संधी मिळेल. त्यामुळे लढाई चुरशीची होणार आहे.
दरम्यान, आयपीएल 2027 मध्ये सामन्यांची संख्या 94 पर्यंत वाढवली जाणार आहे. म्हणजेच साखळी फेरीत 90 सामने होतील. त्यामुळे साखळी फेरीत प्रत्येक संघ दोन वेळा आमनेसामने येईल. यामुळे 2027 मध्ये ही स्पर्धा पुन्हा लीग स्वरूपात होणार आहे. सध्या आयपीएलचे आयोजन राउंड रॉबिन पद्धतीने केले जाते.आतापर्यंतच्या पर्वात एक संघ पाच संघांसोबत दुहेरी सामने खेळत आहे. येणाऱ्या पर्वात ही संख्या 84 साली तर प्रत्येक संघाला सात संघासोबत दुहेरी सामने खेळावे लागतील. आयपीएल 2021 मध्ये एकूण 60 सामने झाले. यामध्ये 56 साखळी सामने, 4 प्लेऑफ सामने झाले. यावेळी प्रत्येक संघाने एकमेकांविरुद्ध दोन-दोन सामने खेळले होते. तेव्हा संघांची संख्या ही 8 होती. त्यानंतर दोन संघ आणखी वाढले. 2022 पासून आयपीएलचे आयोजन राउंड रॉबिन स्वरूपात केले जात आहे. आयपीएल 2025 आणि 2026 मध्येही हा फॉर्मॅट सुरू ठेवला जाईल.
बीसीसीआय सध्या सामन्यांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा करत असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. या पर्वातही प्लेऑफ पॅटर्नमध्ये काहीच बदल होणार नाही. पहिला क्वालिफायर सामना, एलिमिनेटर सामना, दुसरा क्वालिफायर सामना आणि अंतिम सामना असंच स्वरुप असेल.