महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर फक्त आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. म्हणजे वर्षातून फक्त ही एकमेव लीग स्पर्धा खेळतो. त्यामुळे धोनीला फलंदाजी करताना पाहण्याची एकच संधी असते. पण त्यातही चाहत्यांच्या पदरी निराशा पडते. कारण त्याच्या वाटेला एक दोन चेंडू आले तर येतात. त्यामुळे त्याला हवी तशी फलंदाजी करताना पाहणं दुर्लभ झालं आहे. आता धोनीने या मागचं कारण स्पष्ट केलं आहे. महेंद्रसिंह धोनीने जियोस्टारशी बोलताना सांगितलं की, ‘मला आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान गुडघ्याची दुखापत होती. त्यामुळे ते वर्ष काळजी घेण्याचं होतं. त्यानंतर 2024 मध्ये विश्वचषक टी20 साठी निवड होणार होती. आमच्या टीममधून रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे दावेदार होते. यासाठी त्यांना दावा दाखवण्यासाठी संधी देणं आवश्यक होतं.’
महेंद्रसिंह धोनीने पुढे सांगितलं की, ‘माझी संघात निवड होणार नव्हती आणि कोणत्याही जागेसाठी शर्यतीत नव्हतो. तर ते दोघं चांगली कामगिरी करत होते. त्यांना संधी देऊन फ्रेंचायझीचं नुकसान होत होतं असाही भाग नाही. प्रत्येक जण त्यांची जबाबदारी पार पाडत होता आणि दबाव सहन करत असेल तर का नको? हाच विचार होता. जर ते चांगले खेळले नसते तर विचार बदलला असता. जर कोणत्या निर्णयाने सर्वांचा फायदा होत असेल तर तसा विचार का करू नये?’
दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. ‘ऋतुराज गायकवाड गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या संघाचा भाग आहे. त्याचा स्वभाव चांगला आहे. खूप शांत आहे आणि धैर्यशील आहे. त्यामुळेच त्याची कर्णधारपदी नियुक्ती केली. मला आठवतं की स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मी त्याला सांगितलं होतं की, जर मी तुला सल्ला दिला तर त्याचा अर्थ असा नाही की त्याचं पालन केलंच पाहीजे. मी जितकं शक्य होईल तितकं लांब राहण्याचा प्रयत्न करतो.’