मुंबई : वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील युवा खेळाडूंसाठी आयपीएल लिलावात मोठमोठ्या बोली लागल्याचं रविवारी पाहायला मिळालं. भारताच्या विश्वचषक विजेत्या अंडर-19 संघाचा सदस्य असलेल्या राजवर्धन हंगर्गेकरला (Rajvardhan Hangargekar) त्याचा पहिला IPL संघ मिळाला आहे. IPL-2022 च्या महा लिलावात (IPL-2022 Mega Auction) या गोलंदाजाने त्याची बेस प्राईस 30 लाख रुपये इतकी ठेवली होती. महेद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) 1.50 कोटी रुपयांची बोली लावत या खेळाडूचा आपल्या ताफ्यात समावेश केला. मुंबई इंडियन्सनेही या खेळाडूसाठी बोली लावली होती, पण चेन्नई आणि लखनौ सुपरजायंट्सने या खेळाडूवर अधिक विश्वास दाखवला. या दोन चेन्नई आणि लखनौमधलं बिडींग वॉर 1.50 कोटी रुपयांपर्यंत गेलं.
राजवर्धनला संघात घेण्यासाठी सर्वात आधी मुंबई इंडियन्सने बोली लावली होती. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने या लिलावात उडी घेतली. मुंबई इंडियन्स आणि लखनौमध्ये काही वेळ जुगलबंदी झाली. त्यानंतर अचानक चेन्नई सुपरकिंग्जने या लिलावात एंट्री घेतली. राजवर्धनसाठीचं बिडींग वॉर 90 लाखांच्या पुढे गेल्यावर मुंबईने माघार घेतली. मग लखनौ आणि चेन्नईमध्ये बिडींग वॉर सुरु झालं. शेवटी चेन्नई सुपरकिंग्जने तब्बल 1 कोटी 50 लाख रुपयांच्या बोलीवर या नव्या दमाच्या वेगवान गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेतले. राजवर्धन आता आयपीएलमध्ये पिवळ्या जर्सीत खेळताना दिसणार आहे.
लिलावात चेन्नईने राजवर्धनसाठी बोली लावणे हा राजवर्धनसाठी एक भावनिक क्षण होता कारण चेन्नई हा त्याच्या वडिलांचा आवडता संघ आहे. आता राजवर्धन या संघात सामील झालेला असताना हा दिवस पाहण्यासाठी त्याचे वडील हयात नाहीत. राजवर्धनच्या वडिलांचे 2020 मध्ये कोविडमुळे निधन झाले. चेन्नई सुपर किंग्स हा त्याच्या वडिलांचा आवडता संघ होता आणि संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्यांचा आवडता क्रिकेटपटू होता. काही महिन्यांनंतर राजवर्धनच्या अंगावर CSK ची जर्सी असेल.
राजवर्धन रविवारी लिलाव पाहत होता. त्याच्यासारख्या युवा खेळाडूसाठी हे एखाद्या स्वप्नासारखे होते. इंग्लिश वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसशी बोलताना राजवर्धन म्हणाला, “माझ्या वडिलांना CSK हा संघ खूप आवडायचा आणि ते वैयक्तिकरित्या त्या टीमला फॉलो करायचे. आजचा दिवस पाहण्यासाठी ते आपल्यात असायला हवे होते. ते जिथे कुठे असतील तिथे नक्कीच आनंदी असतील. याबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.” वडिलांबाबत बोलताना राजवर्धनला गहिवरुन आलं होतं.
राजवर्धन हा महाराष्ट्रातील तुळजापूर शहरातला रहिवासी आहे. त्याच्या गावात, तो टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा आणि ऑफ-स्पिन गोलंदाजी करत होता. परंतु वयाच्या 14 व्या वर्षी तो वेगवान गोलंदाज बनला. 2016-17 च्या विजय मर्चंट ट्रॉफीसाठी त्याची निवड झाली होती. येथून तो स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच तेजस मातापूरकर यांच्या नजरेत आला आणि त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत 141.7 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती. राजवर्धनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवले आहे. पाच लिस्ट ए सामन्यात त्याने 10 विकेट घेतल्या आहेत. आता त्याला 19 वर्षांखालील विश्वचषकानंतर भारतीय संघाचा भाग व्हायचे आहे.
Blue Colt is now a Yellove Bolt! ⚡#SuperAuction #WhistlePodu ?? pic.twitter.com/xCU5kLoZND
— Chennai Super Kings – Mask P?du Whistle P?du! (@ChennaiIPL) February 13, 2022
राजवर्धन हंगर्गेकर हा खेळाडू मूळचा धाराशीवचा आहे. वेगवान गोलंदाजी करणाऱ्या राजवर्धनने युवा (19 वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत फलंदाजीतही योगदान दिले. या स्पर्धेत सहा सामन्यांमध्ये त्याने 5 बळी घेतले. आयर्लंडकिरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने 17 चेंडूंत 5 षटकार व एका चौकारासह 39 धावा फटकावल्या. गोलंदाजीबरोबरच उपयुक्त फलंदाजी करण्याचे कौशल्य त्याच्याकडे असल्याने चेन्नई संघाने त्याला आपल्या संघात घेण्यात रस दाखवला.
अंडर-19 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात राजवर्धनने 38 धावांत एक विकेट घेतली होती. यानंतर आयर्लंडविरुद्ध त्याने 17 धावांत एक विकेट घेतली आणि नाबाद 39 धावा केल्या. युगांडाविरुद्ध त्याने आठ धावांत दोन बळी घेतले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने बांगलादेशच्या एका फलंदाजाला बाद केले. मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला एकही विकेट घेता आली नाही. फायनलमध्येही त्याला इंग्लंडविरुद्ध विकेट मिळाली नव्हती.
इतर बातम्या
खेळाडूंची किंमत वाढवतो, पण घेत तर नाही! कोणंय हा, जो खाली करतोय प्रतिस्पर्ध्यांची कोटींची पर्स?