दुबई | मुंबई नजिकच्या पालघरमधील असलेल्या मराठमोळ्या शार्दूल ठाकुर याची घरवापसी झाली आहे. दुबईत सुरु असलेल्या आयपीएल ऑक्शन 2024 मधून चेन्नई सुपर किंग्स टीमने शार्दुल ठाकुर याला खरेदी केलं आहे. चेन्नईने शार्दुलसाठी त्याच्या बेस प्राईजच्या दुप्पट रक्कमेत खरेदी केलं आहे. त्यामुळे शार्दुल ठाकुर पुन्हा एकदा यलो जर्सीत खेळताना दिसणार आहे. शार्दूल ठाकूर गत आयपीएल मोसमात शाहरुख खान याच्या मालकीच्या केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्स टीममध्ये होता.
शार्दुल ठाकुर याआधी कोलकाता नाईट रायडर्स टीममध्ये होता. मात्र केकेआरने शार्दुलला करारमुक्त केलं. त्यानंतर शार्दुलने ऑक्शनसाठी स्वत:ची बेस प्राईज ही 2 कोटी ठेवली. ऑलराउंडर्सच्या गटात शार्दूल ठाकुर यांच नावं आलं. बोलीला सुरुवात झाली. शार्दुलला आपल्याकडे घेण्यासाठी बोली 10-20 लाखाने वाढत गेली. वाढता वाढता रक्कम 3 कोटी 50 लाखांच्या पार गेली. मात्र अखेर चेन्नई सुपर किंग्सला शार्दुलला आपल्याकडे घेण्यात यश आलं. चेन्नईने शार्दुलला 4 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.
शार्दूल ठाकुर याने 2014 मध्ये आयपीएल पदार्पण केलं. शार्दूल पहिल्या मोसमात पंजाब किंग्सकडून खेळला. त्यानंतर शार्दूल रायजिंग पुणे सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. केकेआरने शार्दूलला आयपीएल 2022 ऑक्शनमध्ये 10 कोटी 75 लाख रुपये मोजून आपल्या टीममध्ये घेतला होता. शार्दूल केकेआरकडून 2022 आणि 2023 असे 2 वर्ष खेळला. शार्दुलने 2023 मध्ये 11 सामन्यात 1 अर्धशतक, 4 सिक्स आणि 13 चौकारांच्या मदतीने 113 धावा केल्या. शार्दुलने या दरम्यान 68 धावांची सर्वोच्च खेळी केली. तसेच 7 विकेट्सही घेतल्या.
शार्दुलची घरवापसी
Back to Back winning bids for @ChennaiIPL!
Shardul Thakur returns to #CSK 💛 for INR 4 Crore 💰 #IPLAuction | #IPL
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
दरम्यान शार्दूल ठाकुर आतापर्यंत आयपीएलमध्ये 86 सामने खेळला आहे. शार्दूलने या दरम्यान बॅटिंग आणि बॉलिंगने धमाका केलाय. शार्दूलने 34 डावांमध्ये एकूण 286 धावा केल्या आहेत. यामध्ये 12 सिक्स आणि 25 चौकारांचा समावेश आहे. तसेच शार्दूलने 83 डावांमध्ये बॉलिंग करताना 9.16 च्या इकॉनॉमीने 2 हजार 560 धावा देत 89 धावा केल्या आहेत. शार्दूलची 36 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.