मुंबई : आयपीएल 2024 च्या सीझन आता काही महिन्यांवर असून त्याआधी सर्व संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ट्रेडिंग विन्डोमध्ये अनेक खेळाडू बदलताना दिसले, गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. अनेक संघांनी ट्रेडिंग विन्डोमध्ये खेळाडूंची आदलाबदल झाल्याचं पाहायला मिळालं. आता आयपीएल लिलावाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. अशातच आयपीएल लिलावाची तारीख समोर आली आहे.
यंदाची आयपीएल मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आयपीएलचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकांमुळे यंदाची आयपीएल भारतात होणार की नाही याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. याआधी 2009 साली निवडणुकांमुळे संपूर्ण आयपीएलचं आयोजन परदेशात करावं लागलं होतं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावरच आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येतील.
आयपीएल लिलावात सहभागी होण्यासाठी खेळाडूंना 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असल्याची माहिती समजत आहे. यंदाचा लिलाव हा 19 डिसेंबरला होणार दुबईमध्ये पार पडणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. यंदाच्या लिलावामध्ये कोणत्या खेळाडूला सर्वाधिक बोली लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, यंदाच्या लिलावामध्ये गुजरात टायटन्स संघाकडे सर्वाधिक पैसे आहेत. हार्दिक पंड्याला मुंबईने ट्रेड करत घेतल्याने गुजरातचा खिसा गरम झाला आहे. गुजरात संघाकडे 38. 15 कोटी रूपये आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सनराईजर्स हैदराबादकडे 34 कोटी आणि तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे 32.7 कोटी आहेत. आरसीबी आणि केकआर संघाला त्यांचा बॉलिंग लाईनअप मजबूत करायचा आहे. प्रत्येत टीम मॅनेजमेंटसमोर संघ बळकट करण्याचं आव्हान असणार आहे.