आयपीएल 2025 मेगा लिलावाची तयारी पूर्ण झाली आहे. दर तीन वर्षांनी मेगा लिलाव होत असतो. त्या दृष्टीने फ्रेंचायझींनी रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. तसेच आरटीएम कार्डचं ऑप्शनही ठेवलं आहे. सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा लिलाव पार पडणार आहे. ठरलेल्या तारखेनुसार 577 खेळाडूंवर बोली लागणार आहे. पण आता लिलावाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयने लिलावाच्या वेळेत बदल केला आहे. 24 नोव्हेंबरला भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता मेगा लिलाव प्रक्रिया सुरु होणार आहे. यापूर्वी दुपारी 1 वाजता मेगा लिलाव प्रक्रिया होणार होती. पण सौदी अरेबियाच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता लिलाव प्रक्रिया सुरु होईल. तेव्हा भारतात दुपारचे 3.30 वाजलेले असणार आहेत. ब्रॉडकास्टर्सच्या सांगितल्यानंतर हा बदल केल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे. बीसीसीआयने प्रेस रिलीजमध्ये सांगितलं की, ‘कृपया लक्ष द्या, लिलावाची वेळ सौदी अरेबियाच्या वेळेनुसार दुपारी 1 वाजता/ भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता असेल.’
मेगा लिलाव प्रक्रिया दोन दिवसांची आहे. त्यामुळे दोन्ही दिवशी मेगा लिलाव प्रक्रिया दुपारी 3.30 वाजता सुरु होईल. पहिल्या टप्प्यात लिलाव संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर लंच होईल आणि भारतीय वेळेनुसार 5.45 मिनिटांपासून रात्री 10.30 वाजेपर्यंत दुसरा टप्पा सुरु होईल. दोन्ही दिवशी असंच शेड्युल असणार आहे. यात 367 भारतीय आणि 210 विदेशी खेळाडू असणार आहेत. आता फ्रेंचायझी आपल्या गरजेनुसार खेळाडूंवर बोली लावतील. पंजाब किंग्सच्या पर्समध्ये सर्वाधिक पैसे आहेत. त्यामुळे पंजाबकडून मोठी बोली लावल्याचं पाहायला मिळू शकतं.
आयपीएल मेगा लिलावाची सुरुवात मार्कि प्लेयर सेटने होईल. यात दिग्गज खेळाडू असून त्यांच्यावर फ्रेंचायझीच्या नजरा खिळल्या आहे. पहिल्या सेटमध्ये जोस बटलर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग आणि मिचेल स्टार्क आहेत. दुसऱ्या सेटमध्ये युजवेंद्र चहल, लियाम लिविंगस्टोन, डेविड मिलर, केएल राहुल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज हे खेळाडू आहेत. मार्की प्लेयरसाठी मोठी रक्कम मोजली जाण्याची शक्यता आहे. खासकरून ऋषभ पंतला किती पैसे मिळतात आणि लिलावात कोणात चढाओढ होते याची उत्सुकता लागून आहे.