आयपीएल 2024 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीत प्रत्येकी 14 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी प्रत्येक संघांने आपले 12 किंवा 13 सामने खेळलेले आहेत. पण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीच किंग असल्याचं दिसून आलं आहे. विराट कोहलीच्या डोक्यावरील कॅप हिरावून घेणं भल्याभल्या फलंदाजांना शक्य होताना दिसत नाही. विराट कोहलीच्या जवळ आलं की लगेच पुढच्या सामन्यात हे अंतर वाढताना दिसत आहे. विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्यातील अंतर हे फक्त एका धावेचं होतं. पण त्यानंतर पुढच्याच सामन्यात विराट कोहली हे अंतर वाढवलं. रविवारी झालेल्या डबल हेडर सामन्यातही विराट कोहलीच्या डोक्यावरील कॅप घेणं शक्य झालं नाही. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने 41 नाबाद 42 धावांची खेळी केली. मात्र तरीही हे अंतर कापू शकलं नाही. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 13 चेंडूत 27 धावा केल्या. त्यामुळे हे अंतर काही धावांनी आणखी वाढलं.
विराट कोहलीने 13 सामन्यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने 661 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने 13 सामन्यात 583 धावा केल्या. या दोघांमध्ये 78 धावांचं अंतर आहे. दोन्ही खेळाडूंना साखळी फेरीत आणखी एक सामना खेळायचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघ या सामन्यात समोरासमोर येणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण वरचढ ठरतो आणि ऑरेंज कॅपचा मान मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सामन्यात चेन्नईने बाजी मारली तर ऋतुराज गायकवाडला आणखी काही धावा जोडण्याची संधी मिळेल.
सनरायझर्स हैदराबादचा ट्रेव्हिस हेडने 11 सामन्यात 533 धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणखी 3 सामने खेळायचे आहेत. त्यात ट्रेव्हिस हेडचा फॉर्म पाहता त्याच्याकडून हे अंतर कमी करण्याची अपेक्षा आहे. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन या यादीच चौथ्या स्थानावर आहे. त्याने 12 सामन्यात 527 धावा केल्या आहे. दोन सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. तर पाचव्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन असून त्याने 12 सामन्यात 486 धावा केल्या आहेत.