लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर विजय मिळवला आहे. लखनऊने आरसीबाचा घरच्या मैदानात 28 धावांनी धुव्वा उडवला आहे. लखनऊने आरसीबीला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र आरसीबाला 19.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 153 धावांपर्यंतच मजल मारता आली. लखनऊ सुपर जायंट्सचा हा आयपीएलच्या 17 व्या मोसमात सलग दुसरा विजय ठरला आहे. तर आरसीबीचा हा तिसरा पराभव ठरला.
आरसीबीकडून महिपाल लोमरुर याने सर्वाधिक 33 धावा केल्या. रजत पाटीदार याने 29 धावांचं योगदान दिलं. विराट कोहली याने 22, कॅप्टन फाफ डु प्लेसिस 19, मोहम्मद सिराज 12 आणि अनुज रावत याने 11 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. लखनऊकडून मयंक यादव याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. नवीन उल हक याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मार्क्स स्टोयनिस, यश ठाकुर आणि मनीरमण सिददार्थ या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून एलएसजीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. क्विंटन डी कॉक याने 81 धावांची तडाखेदार खेळी केली. तर निकोलस पूरन याने 40 धावांची झंझावाती खेळी केली. कॅप्टन केएल राहुल याने 20 आणि मार्क्स स्टोयनिस याने 24 धावांचं योगदान दिलं. लखनऊने या चौघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 181 धावांपर्यंत मजल मारली. तर आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेल याने 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, यश दयाल आणि रीसे टोपली या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
आरसीबीला घरच्या मैदानात सामना गमवावा लागला असला तरी विराट कोहली याने पुन्हा एकदा ऑरेंज कॅप मिळवली आहे. रियान पराग याच्याकडे या सामन्याआधी ऑरेँज कॅप होती. रियानने राजस्थान रॉयल्सकडून या हंगामातील 14 व्या सामन्यात सलग दुसरं अर्धशतक ठोकून 181 धावांपर्यंत मजल मारली. रियानने अशाप्रकारे विराटची बरोबरी केली. विराट आणि रियान या दोघांच्या नावे 181 धावाच होत्या. मात्र रियानचा स्ट्राईक रेट विराटच्या तुलनेत चांगला होता. त्यामुळे रियानला ऑरेँज कॅपचा मानकरी ठरवलं. मात्र त्यानंतर विराटने लखनऊ विरुद्ध 22 धावा करुन पुन्हा ऑरेँज कॅप मिळवली. विराटच्या नावावर आता 4 सामन्यात 203 धावा झाल्या आहेत.
तसेच या सामन्यानंतर टॉप 5 मध्येही बदल झाला आहे. रियान परागची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. हैदराबादच्या निकोलस पूरन याने तिसरं स्थान कायम राखलंय. तर निकोलस पूरन आणि क्विंटन डी कॉक हे दोघे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी पोहचले आहेत. तर सामन्याआधी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या शिखर धवन आणि डेव्हीड वॉर्नर या दोघांची सहाव्या आणि सातव्या स्थानी घसरण झालीय.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेईंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), मयंक डागर, रीस टोपले, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.
लखनऊ सुपर जांयट्स : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकुर, नवीन-उल-हक, मयंक यादव आणि मणिमरन सिद्धार्थ.