आयपीएल 2024 स्पर्धेत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या रन मशिन्स विराट कोहलीला गाठणं खूपच कठीण झालं आहे. रविवारी झालेल्यासामन्यात विराट कोहलीने 44 चेंडूत नाबाद 70 धावांची खेळी केली. यात 6 चौकार आणि 3 षटकार होते. त्यामुळे विराट कोहलीला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गाठणं खूपच कठीण आहे. विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यात 147.49 च्या स्ट्राईक रेटने 500 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आतापर्यंतच्या खेळीत 1 शतक आणि 4 अर्धशतकं झळकावली आहेत. या खेळीत त्याने 46 चौकार आणि 20 षटकार मारले आहेत. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या ऋतुराज गायकवाडची बॅट चांगलीच तळपली. ऋतुराज गायकवाडने 54 चेंडूत 98 धावांची खेळी केली. यात 10 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचं या स्पर्धेतील दुसरं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. त्यामुळे ऋतुराज गायकवाड या शर्यतीत कुठे याची उत्सुकता अनेकांना लागून आहे. तर ऋतुराज गायकवाड दुसऱ्या स्थानावर आला आहे.
ऋतुराज गायकवाडने 9 सामन्यात एकूण 447 धावा केल्या आहेत. नाबाद 108 ही सर्वोत्तम खेळी आहे. ऋतुराजने 1 शतक आणि तीन अर्धशतकं झळकावली आहेत. 48 चौकार आणि 13 षटकार मारले आहेत. विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्यातील ऑरेंज कॅपचं अंतर 53 धावांचं आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यातही विराट कोहलीला गाठणं कठीण आहे. तिसऱ्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आहे. त्याने 10 सामन्यात 418 धावा केल्या आहेत. अजून चार सामन्यात चांगली कामगिरी करून ऑरेंज कॅपचा मान मिळवू शकतो.
चौथ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आहे. आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यात संजू सॅमसनने 385 धावा केल्या आहेत. त्याने 4 अर्धशतकं झळकावली आहेत. यात 36 चौकार आणि 17 षटकारांचा समावेश आहे. ऑरेंज कॅपच्या यादीत पाचव्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आहे. त्याने 9 सामन्यात एकूण 378 धावा केल्या आहेत. त्याच्या खेळीत 3 चौकारांचा समावेश आहे.दरम्यान, सनरायझर्स हैदराबादच्या ट्रेव्हिस हेडला मोठी धावसंख्या करून टॉप 5 मध्ये एन्ट्री मारण्याची संधी होती. मात्र चेन्नई विरुद्धच्या सामन्यात फेल गेला. तुषार देशपांडेने त्याला 13 धावांवर असताना तंबूचा रस्ता दाखवला.