मुंबई : आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीत पाच संघांमध्ये जबरदस्त चुरस आहे. दोन गुणांसोबत सामन्यातील रनरेटही महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे उर्वरित चारही सामने महत्त्वाचे ठरणार आहेत. दिल्ली विरुद्ध चेन्नई, कोलकाता विरुद्ध लखनऊ, मुंबई विरुद्ध हैदराबाद आणि बंगळुरु विरुद्ध गुजरात असे चार सामने रंगणार आहेत. त्यात हैदराबाद, कोलकाता आणि दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर राजस्थानच्या आशा जर तर वर अवलंबून आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात कसं आहे समीकरण जाणून घेऊयात
चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना जिंकला तर थेट प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळेल. सध्या 15 गुण असून 17 गुण होतील. पण सामना गमावला तर 15 गुण राहतील. त्यामुळे आरसीबी आणि मुंबईच्या सामन्यातील निकालावर सर्व काही अवलंबून असेल. या दोन्ही संघांचे प्रत्येकी 14 गुण असून सामना जिंकला तर 16 गुण होतील.
चेन्नई सुपर किंग्स प्रमाणेच लखनऊ सुपर जायंट्सचं असेल. लखनऊचा शेवटचा सामना कोलकात्यासोबत आहे. हा सामना जिंकला तर 17 गुणांसह प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळेल. पण सामना गमावला तर 15 गुण राहतील आणि आरसीबी आणि मुंबईच्या सामन्यातील निकालावर सर्व काही अवलंबून राहावं लागेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 14 गुण आणि +0.180 च्या रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. बंगळुरुचा शेवटचा सामना गुजरात सोबत आहे. हा सामना जिंकला तर मुंबई मागे टाकून थेट प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळेल. बंगळुरुचा रनरेट चांगला आहे.
चेन्नई किंवा लखनऊने शेवटचा सामना गमावला आणि बंगळुरुने जिंकला तर थेट प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळेल. पण शेवटचा सामना गमावला तर मात्र कठीण होईल.
राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. पण एकही सामना शिल्लक नाही.त्यामुळे बंगळुरु आणि मुंबईच्या सामन्यावर सर्वकाही अवलंबून असेल. पण तरीही संधी मिळणं कठीण आहे.
मुंबई इंडियन्सचे सध्या 14 गुण आहेत. शेवटचा सामना हैदराबाद विरुद्ध आहे. हा सामना जिंकल्यास 16 गुण होतील. पण चांगला रनरेट ठेवणं आवश्यक आहे. चेन्नई, लखनऊचा निकाल वेगळा लागला तर नो टेन्शन असेल. बंगळुरुच्या रिझल्टही मुंबईसाठी महत्त्वाचा आहे.
आता प्लेऑफच्या शर्यतीत कोण बाजी मारतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गुजरातने गेल्या वर्षी आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. चेन्नईने चार वेळा, मुंबई इंडियन्सने पाच वेळा, राजस्थाने एकवेळा, तर बंगळुरु आणि लखनऊ अजूनही जेतेपदापासून दूर आहेत.