केएल राहुल याच्या नेतृत्वात लखनऊ सुपर जायंट्सने सलग दुसरा विजय मिळवला आहे. लखनऊने बंगळुरुवर 28 धावांवर मात केली आहे. लखनऊने बंगळुरुला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बंगळुरुला 19.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 153 धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीकडून महिपाल लोमरुर याने सर्वात जास्त 33 धावा केल्या. तर रजत पाटीदार 29, विराट कोहली 22, फाफ डु प्लेसिस 19, मोहम्मद सिराज 12 आणि अनुज रावत याने 11 धावा केल्या. तर लखनऊकडून युवा मंयक यादव याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. नवीन उल हक याने 2, तर यश ठाकुर, मार्कस स्टोयनिस आणि मनीरमन सिद्दार्थ या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
लखनऊला या विजयासह मोठा फायदा झाला आहे. लखनऊने पॉइंट्स टेबलमध्ये 2 स्थानांची झेप घेतली आहे. तसेच लखनऊच्या विजयामुळे गुजरात टायटन्स आणि सनराजर्स हैदराबादला मोठा फटका बसला आहे. लखनऊ या सामन्याआधी सहाव्या स्थानी होती, ती विजयानंतर चौथ्या स्थानी विराजमान झाली आहे. तर गुजरात टायटन्सची चौथ्या क्रमांकावरुन पाचव्या स्थानी घसरण झालीय. तर हैदराबाद सहाव्या स्थानी पोहचली आहे.
लखनऊचा या सामन्याआधी नेट रनरेट हा 0.025 इतका होता. मात्र या विजयानंतर नेट रनरेट सुधारला आहे. लखनऊचा नेट रनरेट हा आता 0.483 इतका झाला आहे. तर आरसीबीचा नेट रनरेट सामन्याआधी -0.711 इतका होता. तो आता तिसऱ्या पराभवानंतर -0.876 असा झाला आहे. तसेच आरसीबी या 17 व्या मोसमात आतापर्यंत 3 सामने गमावणारी मुंबई इंडियन्सनंतर दुसरी टीम ठरली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेईंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), मयंक डागर, रीस टोपले, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.
लखनऊ सुपर जांयट्स : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकुर, नवीन-उल-हक, मयंक यादव आणि मणिमरन सिद्धार्थ.