IPL 2025 Points Table: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीची सरशी, गुणतालिकेत गाठलं पहिलं स्थान

| Updated on: Mar 22, 2025 | 11:03 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत आता टॉपमध्ये राहण्याची शर्यत रंगली आहे. पहिल्या सामन्यापासून खऱ्या अर्थाने ही लढत सुरु झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्या सामन्यात कोलकात्याच्या 7 गडी राखून पराभव केला आणि पहिलं स्थान गाठलं.

IPL 2025 Points Table: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीची सरशी, गुणतालिकेत गाठलं पहिलं स्थान
Image Credit source: RCB Twitter
Follow us on

आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपला आक्रमक अंदाज दाखवला. कोलकात्याचं होमग्राउंड असलेल्या ईडन गार्डनवर 7 गडी राखून आरसीबीने विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल झाल्यापासून आरसीबीने या सामन्यावर पकड मजबूत केली होती. कौल बाजूने लागल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान होतं. हे आव्हान आरसीबीच्या गोलंदाजांनी चोखपणे पार पाडलं. कोलकात्याने 8 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावा दिल्या. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 16.2 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह आरसीबीने स्पर्धेतील सुरुवात विजयाने केली आहे. या सामन्यात विराट कोहलीने 36 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 59 धावा केल्या. तर फिल सॉल्टने 56 धावा करून आधीच सामन्याची हवा काढली होती.

या स्पर्धेतील साखळी फेरीत प्रत्येक संघाला 14 सामने खेळायचे आहे. आरसीबीने पहिला सामना जिंकला आहे. आता 13 सामन्यापैकी 9 सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफचं स्थान पक्कं होईल. खरं तर हे गणित स्पर्धेदरम्यान बदलत राहील. पण मागचं गणित पाहता हे गणित काही अंशी लागू होतं. मागच्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स 14 पैकी 9 सामन्यात जिंकली होती. तर 3 सामन्यात पराभव झाला होता. दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यामुळे 20 गुणांसह अव्वल स्थानी होता. तर आरसीबी 14 गुण आणि नेट रनरेट चांगला असल्याने प्लेऑफसाठी क्वालिफाय झाली होती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्या सामन्यात 7 गडी आणि 22 चेंडू राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे आरसीबीच्या खात्यात दोन गुण आले आहेत. पण नेट रनरेटमध्येही फायदा झाला आहे. आरसीबीचा नेट रनरेट +2.137 आहे. मागच्या पर्वात नेट रनरेटमुळेच आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोली होती. कारण आरसीबी, सीएसके, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे प्रत्येकी गुण होते. पण आरसीबीचा नेट रेट इतर तिघांपेक्षा चांगला होता. आरसीबीचा पुढचा सामना 28 मार्चला चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. या सामन्यात आरसीबीच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.