मुंबई : भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने आपल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. प्रवीण कुमारने ललित मोदींबाबत मोठा खुलासा केला आहे. आयपीएलमधील कथित गैरव्यवहारप्रकरणी ललित कुमार सध्या फरार आहे. आता त्याच ललित मोदीचं आणखी एक कृत्य समोर आणलं आहे. माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार याने एका मुलाखतीत गंभीर आरोप केले आहेत. इतकंच काय तर करिअर संपुष्टात आणण्याची धमकी ललित मोदी यांनी दिल्याचा खुलासा केला आहे. प्रवीण कुमारने आपल्या मुलाखतीत सांगितलं की, आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळायचं नव्हतं. दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळण्याची इच्छा होती. कारण घर मेरठजवळ होतं. पण एका चुकीमुळे असं झालं नाही.
आरसीबीच्या एका अधिकाऱ्याने प्रवीण कुमारची स्वाक्षरी एका पेपरवर घेतली होती. पण त्याबाबत त्याला तशी कल्पना नव्हती. त्यानंतर कळलं की तो एक करार होता. त्यानंतर नाराज झालेल्या प्रवीण कुमारने आयपीएल कमिश्नर प्रवीण कुमार याला आपल्या पसंतीबाबत सांगितलं. तेव्हा ललित मोदी यांनी करिअर संपवण्याची धमकी दिल्याचं प्रवीण कुमारने सांगितलं. पण त्यानंतर वीरेंद्र सेहवागने समजूत घालून आरसीबीसाठी खेळण्यास सांगितलं.
“मला आरसीबीसाठी खेळायचं नव्हतं. कारण बंगळुरू माझ्या घरापासून खूपच दूर होतं. मला इंग्रजी येत नव्हतं आणि तिकडचं जेवणंही रुचत नव्हतं. दिल्ली मेरठ जवळ आहे आणि कधी कधी मी घरी येऊ शकत होतो. पण एका व्यक्तीने माझ्याकडून पेपर साईन करून घेतले. तेव्हा मला माहिती नव्हतं की तो करार आहे. मी त्यांना सांगितलं की मी दिल्लीकडून खेळू इच्छितो बंगळुरुसाठी नाही. मी ललित मोदींना फोन केला तेव्हा त्यांनी माझं करिअर संपवण्याची धमकी दिली.”, असं प्रवीण कुमारने सांगितलं.
प्रवीण कुमार टीम इंडियासाठई 6 कसोटी, 68 वनडे आणि 10 टी20 सामने खेळला आहे. तर आयपीएलचे 119 सामने खेळला. त्यात 90 गडी बाद केले. आयपीएलमध्ये प्रवीण कुमारचं करिअर आरसीबीकडून सुरु झालं. आयपीएलमध्ये पहिला चेंडू टाकण्याचा मान प्रवीण कुमारला मिळाला होता. त्यानंतर प्रवीण कुमार पंजाब किंग्सकडून खेळला होता.