आयपीएल 2024 स्पर्धेतील 65वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानने 20 षटकात 9 गडी गमवून 144 धावा केल्या आणि विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं. पंजाब किंग्सने हे आव्हान 18.5 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात पंजाब किंग्सकडून हर्षल पटेलने दोन गडी बाद केले आणि पर्पल कॅपचा मान मिळवला. हर्षल पटेलने 4 षटकात 28 धावा देत 2 गडी बाद केले. पर्पल कॅपच्या शर्यतीत हर्षल पटेल आता पहिल्या स्थानावर आहे. हर्षल पटेलने 13 सामन्यात 45 षटकं टाकत 428 धावा दिल्या आणि 22 गडी बाद केले. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट 9.51 इतका आहे. दुसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आहे. त्याने 13 सामन्यात 51.5 षटकं टाकली आणि 336 धावा देत 20 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट हा 6.48 इतका आहे.
तिसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती आहे. त्याने 12 सामन्यात 44 षटकं टाकत 367 धावा देत 18 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा 8.34 इतका आहे. चौथ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा खालीद अहमद आहे. त्याने 14 सामन्यात 50 षटकं टाकली आणि 479 धावा देत 17 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट हा 9.58 इतका आहे. पाचव्या स्थानावर अर्शदीप सिंग आहे. त्याने 13 सामन्यात 46.2 षटकं टाकत 468 धावा दिल्या आणि 17 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट हा 10.10 इतका आहे.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सची पराभवाची मालिका सुरुच आहे. एकापाठोपाठ एक असे चार सामने गमावले आहेत. सुरुवातीला केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे 16 गुणांची कमाई झाली होती. त्यामुळे प्लेऑफचं गणित सुटलं आहे. मात्र मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षीही राजस्थानची कामगिरी सुमार राहिली आहे. मागच्या वर्षी 14 गुण मिळवले होते. दुसरीकडे, मुंबईने पाठून येत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. आता परिस्थिती वेगळी आहे. राजस्थानने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. मात्र शेवटच्या टप्प्यात सुमार कामगिरीचं प्रदर्शन सुरुच ठेवलं आहे. त्यामुळे जेतेपदावर नाव कोरेल की नाही अशी शंका चाहते व्यक्त करत आहेत.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.