मुंबई : आयपीएल 2023 च्या फायनल मॅचला पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना अद्याप सुरू झालेला नाही. पावसामुळे सामना सुरू व्हायला उशिर होऊ शकतो. सर्व क्रिकेट प्रेमी सामना कधी चालू होतोय याची वाट पाहत आहेत, मात्र पाऊस काही थांबताना दिसत नाही. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये हे थरारक फायनल सामना होणार आहे. धोनीची हा शेवटची आयपीएल असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. आयपीएलमध्ये चेन्नईने चारवेळा ट्रॉफीवर नाव कोरलं असून गुजरातला नमवत पाचव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी सीएसके संघाला आहे.
मुंबई इंडिअन्स सर्वाधिक 5 ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. एक खेळाडू म्हणून धोनीचा हा 250 वा सामना असणार असून तो एक विक्रम आहे. 11 आयपीएल फायनल खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. दुसरीकडे, पंड्या पलटण जिंकण्यात यशस्वी ठरली तर, तर जेतेपदावर ते दुसऱ्यांदा नाव कोरत आहेत.
आयपीएलची ट्रॉफी तुम्ही सर्वांनी पाहिले असेल पण तुम्हाला माहित आहे का?, ट्रॉफीवर संस्कृतमध्ये एक श्लोक लिहिलेला आहे. संस्कृतमध्ये लिहिलेले शब्द स्पर्धेशी संबंधित आहेत. ‘यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि’, असं संस्कृतमध्ये लिहिलं असून याचा अर्थ, प्रतिभा आणि संधी एकत्र ठिकाणी असा होतो. या श्लोकाच्या अर्थाप्रमाणे आयपीएलने टीम इंडियाला अनेक प्रतिभावान आणि स्टार खेळाडू दिले आहेत. यामध्ये हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या, ऋषभ पंत, दीपक हुडा, नितीश राणा, श्रेयस अय्यर असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना संधी मिळाली.
दरम्यान, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा सामना पावसामुळे लांबवण्यात आला आहे. 9.35 वाजेपर्यंत जर पाऊस थांबला तरीसुद्धा सामना 20 ओव्हर्सचा होऊ शकतो. मात्र आता पाऊस थांबण्याची वाट पाहावी लागणार आहे. 9.35 पर्यंत जरी पाऊस थांबला नाही आणि 12.35 पर्यंत थांबला तर 5-5 ओव्हर्सची मॅच होणार आहे.