अजिंक्य रहाणे इराणी कप ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर रेस्ट ऑफ इंडिया संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही पुणेकर ऋतुराज गायकवाड याला देण्यात आली आहे. उभयसंघातील सामना 1 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्यात 2 मराठमोळे कर्णधार आमनेसामने असणार आहेत. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबईने काही महिन्यांपूर्वी रणजी ट्रॉफी जिंकली होती. तर ऋतुराजने आपल्या नेतृत्वात टीम इंडिया एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलं. तसेच ऋतुराजने नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीतही नेतृत्व केलं होतं. त्यामुळे अनुभवी अजिंक्य रहाणेसमोर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार आहे.
अभिमन्यू ईश्वरन याला रेस्ट ऑफ इंडिया संघाचं उपकर्णधार करण्यात आलं आहे. तर ध्रुव जुरेल आणि इशान किशन या दोघांना विकेटकीपर म्हणून स्थान देण्यात आलं आहे. यश दयाल याचाही समावेश करण्यात आला आहे. ध्रुव आणि यश या दोघांनी बांगलादेश विरूद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यासाठीही निवड करण्यात आली आहे. मात्र तिथे त्यांना संधी देण्यात येणार नसल्याचं निश्चित असल्याने त्यांची इथे निवड केली गेली आहे. इंडिया-बांगलादेश यांच्यातील दुसरा आणि अंतिम सामना हा 27 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.
तसेच सरफराज खान याला बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या कसोटीतील प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी न मिळाल्यास त्याला या स्पर्धेत स्थान दिलं जाऊ शकतं. तर दुसऱ्या बाजूला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकुर या दोघांना संधी दिली आहे. पृथ्वी शॉ आणि मुशीर खान हे दोघे मुंबईसाठी ओपनिंग करण्याची शक्यता आहे. तसेच शिवम दुबे याला भारतीय संघातून मुक्त केल्यास त्याचाही इराणी ट्रॉफीत समावेश केला जाऊ शकतो.
दरम्यान उभयसंघातील हा सामना 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. हा सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल. तर टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर मॅच पाहायला मिळेल.
इराणी कप स्पर्धेसाठी रेस्ट ऑफ इंडिया टीम : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), अभिमन्यू इश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडीक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर)*, इशान किशन (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, प्रसीध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल *, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद आणि राहुल चहर.
इराणी कप स्पर्धेसाठी मुंबई टीम: अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सिद्धांत अद्धतराव, शम्स मुलानी, तनुश कोटीयन, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी आणि मोहम्मद जुनेद खान.