डब्लिन | टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना हा आज 18 ऑग्स्टला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला डब्लिनमधील द व्हिलेज स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीनंतर जवळपास वर्षभरानंतर टीम इंडियात कमबॅक करणार आहे. जसप्रीत बुमराह याच्याकडे टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडची जबाबदारीही देण्यात आली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना बुमराहच्या पुनरागमनाबाबत उत्सुकता आहे. मात्र या सामन्यात पाऊस व्हिलनची भूमिका बजावू शकतो.
नवी टीम नव्या कॅप्टनसह आयर्लंड विरुद्ध धमाका करण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियात आयपीएल गाजवलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंचा आयर्लंड विरुद्ध तडाखेदार कामगिरी करत निवड समितीचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न असणार आहे. जसप्रीत बुमराह 25 सप्टेंबर 2022 नंतर टी 20 मॅचसाठी मैदानात उतरणार आहे. मात्र पाऊस सामन्याची वाट लावू शकतो.
एक्युवेदरने दिलेल्या माहितीनुसार, डब्लिमध्ये आज कमाल तापमान हे 19 डिग्री सेल्सियस राहिलं. तर किमान तापमान 16 डिग्री असण्याची शक्यता आहे. तसेच आज शुक्रवारी पाऊस होण्याची 94 टक्के शक्यता आहे. तर वारा ताशी 38 किमी वेगाने वाहणार असल्याचं म्हटलं जात आहे.
त्यामुळे पहिल्या टी 20 सामन्यात पावसाने बॅटिंग केल्यास जसप्रीत बुमराह याला कमबॅकसाठी आणखी प्रतिक्षा करावी लागू शकते. या पहिल्या सामन्यातून रिंकू सिंह याचंही पदार्पण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस झाला, तर रिंकूचंही डेब्यू लांबणीवर पडेल. त्यामुळे आता पाऊस होऊन क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होतो की वेळेवर सामना सुरु होतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.