डब्लिन | टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह दुखापतीनंतर 11 महिन्यांनी परतला. बुमराहला आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत कर्णधारपद देण्यात आलं. टीम इंडियाने बुमराहच्या नेतृत्वात विजयी सुरुवात केली. पावसाची एन्ट्री झाल्याने टीम इंडियाने आयर्लंडवर डकवर्थ लुईस नियमानुसार 2 धावांनी विजय मिळवला. आयर्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 140 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने 6.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 47 धावा केल्या. मात्र पावसामुळे सामना टीम इंडियाने जिंकला. या सामन्यातून रिंकू सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांनी पदार्पण केलं. प्रसिद्धने 2 विकेट्स घेत चांगली सुरुवात केली. मात्र पावसामुळे क्रिकेट चाहत्यांना रिंकू सिंहची बॅटिंग पाहायला काही मिळाली नाही.
या सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराह थोडक्यात बचावला. दैव बलवत्तर म्हणून बुमराह बचावला. हा सर्व प्रकार सामन्यातील पहिल्या डावात घडला. बुमराहने टीम इंडियाला पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स मिळवून दिल्या. त्यामुळे टीम इंडियाचे चाहते आनंदी होते. मात्र असं काही झालं ज्यामुळे चाहत्यांची धाकधूक वाढली.
— No-No-Crix (@Hanji_CricDekho) August 18, 2023
वॉशिंग्टन सुंदर सामन्यातील 14 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील 5 व्या बॉलवर आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फर याने फोर ठोकला. रवी बिश्नोई आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी हा फोर अडवायचा प्रयत्न केला. दोघेही वेगवेगळ्या दिशेने धावत आले. रवी बिश्नोई डीप बॅकवर्ड स्केवयर लेगहून धावत आला आणि बॉल अडवण्यासाठी घसरला. बिश्नोईने जवळपास बॉल अडवला होता. तर दुसऱ्या बाजूने बुमराहपण वेगात आला. बुमराह आणि बिश्नोईची धडक होणार होती. मात्र बुमराहने वेळीच स्वत:ला सावरलं आणि उडी मारली. त्यामुळे अनर्थ टळला.
बुमराहने उडी मारली नसती, तर कदाचित त्याच्यासोबत बिश्नोई या दोघांना दुखापत होऊ शकली असती. मात्र सुदैवाने तसं काही झालं नाही.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | जसप्रीत बुमराह (कॅप्टन) ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.
आयर्लंड प्लेईंग इलेव्हन | पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.