IRE vs PAK : आयर्लंडचा पाकिस्तानवर 17 वर्षांनी विजय, टी 20 वर्ल्ड कपआधी उलटफेर

| Updated on: May 11, 2024 | 1:11 AM

Ireland vs Pakistan 1st T20I Highlights In Marathi : आयर्लंड क्रिकेट टीमने पाकिस्तानवर पहिल्या टी 20 सामन्यात 5 विकेट्सने मात करत विजयी सुरुवात केली आहे.

IRE vs PAK : आयर्लंडचा पाकिस्तानवर 17 वर्षांनी विजय, टी 20 वर्ल्ड कपआधी उलटफेर
ire vs pak 1st t20i,
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

कायम लिंबूटिंबू समजून गृहित धरल्या जाणाऱ्या आयर्लंड क्रिकेट टीमने पाकिस्तानला हिसका दाखवला आहे. आयर्लंडने पाकिस्तानला पहिल्या टी 20 सामन्यात 5 विकेट्सने लोळवलं आहे. आयर्लंडने पाकिस्तान विरुद्ध विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानने आयर्लंडला विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. आयर्लंडने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात 1 चेंडू राखून पूर्ण केलं. आयर्लंडने 19.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 183 धावा केल्या. आयर्लंडने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कपसाठी ए ग्रुपमध्ये आहेत.

गॅरेथ डेलेनी आणि कर्टिस कॅम्फर या जोडीने आयर्लंडला विजयापर्यंत पोहचवलं. गॅरेथ डेलेनी आणि कर्टिस कॅम्फर या दोघांनी नाबाद 10 आणि 15 धावा केल्या. तर जॉर्ज डॉकरेल याने 24 धावांचं योगदान दिलं. हॅरी टेक्टर याने 27 बॉलमध्ये 3 चौकार आणि 1 षटाकाराच्या मदतीने 36 धावांची बहुमूल्य खेळी केली. कॅप्टन पॉल स्टर्लिंग याने 8 तर विकेटकीपर लॉर्कन टकर याने 4 धावा जोडल्या. तर आयर्लंडसाठी ओपनर अँड्र्यू बालबर्नी याने सर्वाधिक धावा केल्या. अँड्र्यू बालबर्नीने 55 चेंडूत 2 सिक्स आणि 10 फोरसह 77 रन्स केल्या. तर पाकिस्तानकडून अब्बास अफ्रिदी याने 2 विकेट्स मिळवल्या. तर शाहिन अफ्रिदी, नसीम शाह आणि इमाद वसीम या तिघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

17 वर्षांनी विजय

दरम्यान आयर्लंडने पाकिस्तानवर तब्बल 17 वर्षांनी विजय मिळवला. आयर्लंडने याआधी 2007 साली 17 मार्च रोजी पाकिस्तानवर वनडे सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला होता. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं 133 धावांचं आव्हान आयर्लंडने 41.4 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं.

पाकिस्तानचा 5 विकेट्सने विजय

पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा

आयर्लंडने या विजयासह आपण टी 20 वर्ल्ड कपसाठी सज्ज असल्याचं जाहीर केलं आहे. टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सहभागी 20 संघ हे 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आले आहेत. त्यानुसार ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि यूएसए या संघांचा समावेश आहे. एकाच ग्रुपमध्ये असल्याने आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा रविवारी 16 जून रोजी होणार आहे. पाकिस्तानचं या सामन्यात काय होईल? असा प्रश्न आयर्लंड विरुद्ध 5 विकेट्सने झालेल्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

आयर्लंड प्लेईंग ईलेव्हन : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग आणि बेंजामिन व्हाइट.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन : बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, सैम अयुब, फखर जमान, शादाब खान, आझम खान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि अब्बास आफ्रिदी.