अफगाणिस्तान क्रिकेट टीमने यूएईमध्ये एकदिवसीय मालिका विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्ध शारजाहमध्ये 11 नोव्हेंबरमध्ये झालेल्या तिसऱ्या, अंतिम आणि निर्णायक सामन्यात बांगलादेशचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला आणि मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. बांगलादेशने अफगाणिस्तानला विजयासाठी 245 धावांचं आव्हान दिलं होतं. अफगाणिस्तानने हे आव्हान 5 विकेट्स गमावून पू्र्ण केलं. अफगाणिस्तानने 48.5 ओव्हरमध्ये 246 धावा केल्या. रहमानुल्लाह गुरुबाज हा अफगाणिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रहमानुल्लाहने शतकी खेळी केली.
अफगाणिस्तानकडून सेदीकुल्लाह अटल याने 14 धावांचं योगदान दिलं. रहमत शाह 8 आणि हशमतुल्लाह शाहीदी 6 धावा करुन बाद झाले. त्यामुळे अफगाणिस्तानची 3 बाद 84 अशी स्थिती झाली. त्यानंतर रहमानुल्लाह आणि अझमतुल्लाह ओमरझई या दोघांनी 104 धावांची भागीदारी घरत सामना आपल्या बाजूने झुकवला. रहमानुल्लाने या भागीदारीदरम्यान शतकी खेळी केली. रहमानुल्ला त्यानंतर बाद झाला. रहमानुल्लाहने 120 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 5 फोरसह 101 रन्स केल्या. त्यानंतर गुलाबदीन नईब 1 धावेवर माघार परतला.
त्यानंतर अझमतुल्लाह आणि मोहम्मद नबी या जोडीने सहाव्या विकेटसाठी 58 धावांची नाबाद भागीदारी केली आणि अफगाणिस्तानला विजयी केलं. अझमतुल्लाह ओमरझई याने 77 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 70 धावांची खेळी केली. तर मोहम्मद नबी याने 27 बॉलमध्ये 5 फोरसह नॉट आऊट 34 रन्स केल्या. बांगलादेशकडून नाहीद राणा आणि मुस्तफिजुर रहमान या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन मेहदी हसन मिराजने 1 विकेट घेतली.
अफगाणिस्तानने या विजयासह यूएईमध्ये एकदिवसीय मालिका विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. अफगाणिस्तानने याआधी दक्षिण आफ्रिकेला 2-1 ने पराभूत केलं. तर त्याआधी आयर्लंडवर 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजय मिळवलेला.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार),रहमानुल्लाह गुरुबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, गुलबादिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, नांगेलिया खरोटे, अल्लाह गझनफर आणि फजलहक फारुकी.
बांग्लादेश प्लेइंग इलेव्हन : मेहदी हसन मिराझ (कॅप्टन), तन्झिद हसन, सौम्या सरकार, झाकीर हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, जाकेर अली (विकेटकीपर), नसुम अहमद, नाहिद राणा, शॉरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान