बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता, कसं आणि कधी ते समजून घ्या

| Updated on: Sep 15, 2024 | 5:46 PM

इशान किशन टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी धडपड करत आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून इशान किशन आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे पुनरागमनासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये नशिब आजमावत आहे. असं असताना बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड होण्याची शक्यता आहे.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता, कसं आणि कधी ते समजून घ्या
Image Credit source: (फोटो: मॅट रॉबर्ट्स-ICC/ICC द्वारे Getty Images)
Follow us on

दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आल्यानंतर इशान किशनचे तारेच फिरले. त्यानंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळणं कठीण झालं. तसेच आयपीएलमध्ये फलंदाजीत फेल ठरल्याने त्याचा टी20 वर्ल्डकपसाठी विचार केला गेला नाही. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळून टीम इंडियात स्थान मिळवण्याशिवाय पर्याय नव्हता. आता नऊ महिन्यानंतर इशान किशनची टीम इंडियातील पुनरागमनाचे मार्ग मोकळे झाले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत बांग्लादेश मालिकेत इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. इशान किशनने भारतासाठी शेवटचा टी20 सामना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत 9 महिन्यांचा कालावधी लोटला असून टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. पीटीआयच्या बातमीनुसार, बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी इशान किशनला संधी मिळू शकते. इशान किशन टी20 मालिकेत ऋषभ पंतची जागा घेऊ शकतो. ऋषभ पंत कसोटीतील नंबर एक विकेटकीपर आहे. अशाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने एकूण 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे निवड समिती ऋषभ पंतला छोट्या फॉर्मेटमध्ये आराम देण्याची शक्यता आहे.

भारतीय निवड समिती ऋषभ पंतला टी20 मालिकेत ब्रेक देऊन वर्कलोड मॅनेज करू इच्छिते. जर असं झालं तर इशान किशनला 9 महिन्यानंतर टीम इंडियात स्थान मिळणार आहे. इशान किशनने बीसीसीआयच्या सूचनांकडे कानाडोळा केला होता. तसेच वारंवार सूचना करूनही देशांतर्गत क्रिकेट खेळत नव्हता. त्यानंतर बीसीसीआयने त्याला सेंट्रल काँट्रॅक्टमधून वगळलं. अखेर त्याला उपरती झाली आणि देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसला. बुची बाबू स्पर्धेत झारखंड संघाचं नेतृत्व केलं. तसेच पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली. त्यानंतर दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातही शतक ठोकलं आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीचा विचार करून संघात स्थान मिळू शकते.

भारत आणि बांग्लादेश यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका 7 ऑक्टोबरपासून सुरु होईल आणि 13 ऑक्टोबरला संपेल. दोन्ही संघातील पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये होईल. दुसरा सामना दिल्लीत आणि तिसरा सामना हैदराबादमध्ये होणार आहे.